Parliament Security Breach News: संसदेत घुसखोरी आणि कलर कँडल फोडणाऱ्या चार आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी 15 दिवसांची कोठडी मागितली होती, पण पटियाला हाऊस कोर्टाने सात दिवसांची कोठडी मंजूर केली. गरज भासल्यास रिमांड वाढवता येईल, असेही सांगण्यात आले आहे.
फिर्यादीने अटक केलेल्या चार जणांवर दहशतवादाचा आरोप केला आहे. या चौघांनीही भीती निर्माण करण्यासाठी हे कृत्य केल्याचे फिर्यादीचे म्हणने आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात ललित झा मुख्य सूत्रधार असल्याचे बोलले जात असून, तो अद्याप फरार आहे. सध्या पोलिसांनी आरोपींचे फोन जप्त केले असून, तपास सुरू आहे. तसेच, लोकसभेच्या आत आणि संसदेबाहेर फोडण्यात आलेले स्मोक कँडल कुठून खरेदी केले, याची माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही.
संसदेत नेमकं काय घडलं?काल म्हणजेच, 13 डिसेंबर रोजी संसदेवर 2001 मध्ये झालेल्या हल्ल्याला बावीस वर्षे पूर्ण झाली. त्याच दिवशी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या दोघांनी लोकसभेच्या सभागृहात उडी मारली आणि सभापतींच्या खुर्चीकडे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी स्मोक कँडल फोडून सर्वत्र धूर केला. या दोघांनाही खासदारांनीच पकडून चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे सभागृहात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
याशिवाय, इतर दोघांनी संसदेबाहेरही अशाच प्रकारचे स्मोक कँडल फोडले आणि हुकूमशाही चालणार नाही, अशा घोषणा दिल्या. या चौघांनीही जाणून-बुजून हे कृत्य घडवून आणले होते. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना पकडले, तर पाचवा आरोपी सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सध्या या आरोपींवर UAPA अंतर्गत खटला दाखल झाला आहे. आता पोलिसांच्या चौकशीत कोणती माहिती समोर येईल, हे पाहणे महत्वाचे आहे.