मुंबई/इंदूर : वरिष्ठ पत्रकार कल्पेश याग्निक यांच्याकडे पाच कोटी रुपयांची मागणी करून त्यांना कथितरीत्या ब्लॅकमेल करणारी महिला पत्रकार सलोनी अरोरा हिला पोलिसांनी शनिवारी सायंकाळी मुंबई येथे अटक केली. पोलिसांनी साध्या पोषाखात सलोनीच्या मुलाचा पाठलाग केला. सलोनी मुलाला भेटायला येताच पोलिसांनी तिच्या मुसक्या आवळल्या. कल्पेश याग्निक यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांचे भाऊ नीरज यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी २० जुलै रोजी सलोनीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. डीआयजी हरिनारायणचारी मिश्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस गेल्या १५ दिवसांपासूनच सलोनीच्या मागावर होते. तिचा भाऊ, बहीण, मेव्हणा आणि मित्रांसह किमार दीडशेच्या वर लोकांचे फोन कॉल डिटेल्स काढण्यात आले. या दरम्यान दिल्लीत राहणाऱ्या तिच्या मामाचा मोबाईल नंबर पोलिसांच्या हाती लागला. त्या नंबरवरील संभाषणावर पाळत ठेवण्यात आली तेव्हा सलोनी ही मेरठमध्ये असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलीस पथक लगेच मेरठमध्ये पोहोचले. परंतु सलोनी ही एक दिवसापूर्वीच दिल्लीमार्गे मुंबईला रवाना झाली होती. सलोनीचा मुलगा मुंबईच्या अंधेरी येथील एका प्रसिद्ध शिकवणी वर्गाला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना साध्या वेषात या कोचिंग क्लासबाहेर तैनात करून सलोनीच्या मुलावर पाळत ठेवण्यात आली.सलोनी ही शनिवारी आपल्या मुलाला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती तिच्या फोनकॉलवरून मिळाली. त्यानंतर सायंकाळी तिचा मुलगा शिकवणीवर्ग आटोपून पनवेलकडे निघाला. वाटेत सलोनीने मुलाची भेट घेतली आणि तिच्या मागावर असलेल्या पोलिसांनी लगेच सलोनीला अटक केली. अलोनीला रविवारी इंदूरला आणण्यात येणार असल्याची माहिती मिश्र यांनी दिली.
आरोपी सलोनी अरोराला मुंबईत अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 5:14 AM