नवी दिल्ली – २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कमेची फसवणूक करणाऱ्या आरोपी सुकेश चंद्रशेखरबाबत आता आणखी एक नवा खुलासा समोर आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नंबरचाही सुकेशनं फसवणुकीसाठी वापर केला होता. ईडीच्या माहितीनुसार, चंद्रशेखरनं अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) हिच्याशी मैत्री करण्यासाठी ही शक्कल लढवली होती.
शाह यांच्या कार्यालयाचा नंबर वापरुन सुकेशनं जॅकलीनला फोन केला होता. त्यानंतर तो तामिळनाडूमधील दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या राजकीय घराण्याशी संबंधित असल्याचा दावा केला. ईडीनं मनी लॉन्ड्रिंग कायद्यातंर्गत या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. कॉल स्पूफ म्हणजे समोरच्याला फोन केल्यानंतर त्याच्या स्क्रीनवर आपला मोबाईल नंबर दिसण्याऐवजी चुकीचा नंबर दिसतो. एजेन्सीनं यावर्षी दोनवेळा जॅकलीनचा जबाब नोंदवला होता. सुकेशनं जॅकलीनला त्याची ओळख शेखर रत्न वेला या नावानं करुन दिली होती.
ईडीनं या महिन्याच्या सुरुवातीला पीएमएलए कोर्टात आरोपपत्र दाखल करत सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar), त्याची पत्नी लीना मारिया पॉल आणि अन्य ६ लोकांविरोधात आरोप निश्चित केले आहेत. ईडीच्या माहितीनुसार, सुकेशनं जॅकलीनवर पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. जवळपास १० कोटी रुपये सुकेशनं जॅकलीनसाठी खर्च केले. गोल्ड, डायमंड ज्वेलरी, इंपोर्टेड क्रॉकरी दिली होती. ५२ लाखांचा घोडा आणि ४ पार्शियन मांजरी भेट म्हणून दिल्या होत्या. एका मांजरीची किंमत ९ लाख होती. इतकचं नाही तर जॅकलीनसाठी सुकेशने चार्टर्ड फ्लाईट्सवरही कोट्यवधी खर्च केले होते. जॅकलीनला चार्टर्ड प्लेनने मुंबईहून दिल्लीला बोलावलं त्यानंतर दिल्लीहून चेन्नईसाठी चार्टर्ड प्लाइट बूक केली होती. दोघंही चेन्नईच्या आलिशान हॉटेलमध्ये थांबले होते. ३-४ वेळा जॅकलीन आणि सुकेशची भेट झाली होती.
सुकेश चंद्रशेखर सोबतचे रोमॅंटिक फोटो व्हायरल
या केसमध्ये सुरूवातीपासून जॅकलीनचं नाव समोर येत होतं आणि ईडीने अनेकदा जॅकलीनला चौकशीसाठी बोलवलं होतं. जेव्हाही जॅकलीनला सुकेशबाबत विचारलं जात होतं, तेव्हा ती हेच सांगत होती की, ती सुकेशला ओळखत नाही. मात्र त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेशसोबतचा जॅकलीनचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यात दोघेही फार जवळ असल्याचं दिसत आहेत.
काय आहे सुकेशवर आरोप?
सुकेशने जॅकलीन सोबत मैत्री करताना स्वत:ला एक मोठा बिझनेसमन असल्याचं सांगितलं होतं. सुकेशवर २०० कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सुकेशने जॅकलीनला महागडे गिफ्ट दिले होते आणि याच कारणने ईडीने जॅकलीनला चौकशीसाठी बोलवलं होतं. सुकेशवर रॅनबॅक्सीच्या प्रमोटरला तुरूंगातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या पत्नीची २०० कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अभिनेत्री नोरा फतेही हिचीही चौकशी झाली होती.