हरिद्वार : पतंजली योगपीठाचे आचार्य बालकृष्ण यांच्या नेतृत्वाखालील एका गिर्यारोहक पथकाने गंगोत्रीच्या गोमुख परिसरातील अनाम व अपरिचित ३ हिमालय पर्वत शिखरांवर यशस्वी चढाई केली. नेहरू गिर्यारोहन संस्थेच्या साह्याने हाती घेतलेल्या या माेहिमेत तिन्ही पर्वत शिखरांचे नामकरण करण्यात आले.
या शिखरांवर ५५० दुर्मिळ औषधी वनस्पती सापडल्या आहेत. त्यांची चेकलिस्ट तयार करण्यात आली आहे. गंगोत्रीच्या रक्तवर्ण ग्लॅसियर परिसरात करण्यात आलेली ही शोधकार्य मोहीम १० ते २५ सप्टेंबर या काळात चालली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांच्या हस्ते तसेच स्वामी रामदेव यांच्या उपस्थितीत या मोहिमेला गंगोत्री येथे हिरवी झेंडी दाखविण्यात आली होती.
४२ वर्षांनंतर प्रथमच पाऊल
- ४२ वर्षांपूर्वी १९८१ साली फ्रान्स आणि भारत यांच्या संयुक्त पथकाने या पर्वतशिखरांवर चढाई करण्याचा प्रयत्न केला होता.
- त्यानंतर प्रथमच या परिसराला मानवी पाऊल लागले आहे. ६ हजार मीटरपेक्षा अधिक उंच असलेल्या या शिखरांना राष्ट्रऋषी, योगऋषी आणि आयुर्वेद ऋषी अशी नावे देण्यात आली आहेत. तिन्ही शिखरांच्या मध्ये असलेल्या ग्लॅसियरला ऋषी बामक असे नाव दिले आहे.