हरिद्वार: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर अद्यापही पूर्णपणे ओसरलेला दिसत नाही. नव्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊन रिकव्हरी रेट वाढला असला, तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू चिंता वाढवणारे ठरत आहेत. यातच आता अॅलोपॅथी आणि आयुर्वेद यामधील वाद वाढताना दिसत आहे. योगगुरू बाबा रामदेव यांनी आयुर्वेदिक चिकित्सा पद्धत कोरोनावर परिणामकारक असल्याचे सांगत आरोप केले आहेत. यावरून आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. यातच पतंजली योगपीठाचे महामंत्री आचार्य बालकृष्ण यांनी कोरोनिलला विरोध करणाऱ्यांनी पतंजलीमध्ये यावे, तुमच्या प्रश्नांची उत्तरे आणि प्रमाण देऊ, असे म्हटले आहे. (acharya balkrishna says that patanjali is able to give proof for coronil research)
आयुर्वेदिक उपचार पद्धतीचे अवलंब करून आतापर्यंत लाखो रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाच्या उपचारात आयुर्वेद उपचार पद्धती उपयुक्त ठरत आहे. मात्र, आयुर्वेदाच्या मदतीने तयार केलेल्या कोरोनिलचा विरोध हा खाली खेचण्याचा प्रकार आहे, असे आचार्य बालकृष्ण म्हणाले. आधुनिक उपचार पद्धतीने काम करणाऱ्यांना स्वप्नातही वाटले नसेल की, कोरोनावर आयुर्वेदाच्या आधारे तयार केलेले औषध सर्वप्रथम उपलब्ध होईल. मात्र, अशा प्रकारचे औषध अॅलोपॅथीच्या आधी बाजारात आले, तेव्हा एकच खळबळ उडाली, असे आचार्य यांनी सांगितले.
देशात आतापर्यंत किती टक्के लसी वाया गेल्या? ‘या’ राज्याने वाया घालवले सर्वाधिक डोस
तज्ज्ञांची टीम तयार करा आणि पतंजलीमध्ये पाठवा
कोरोनिलच्या वापरानंतर लाखो कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनिलवर केलेले शोध आणि त्याचे प्रमाण दोन्ही आमच्याकडे आहे. जर कोणाला वाटत असेल, तर देशभरातील विद्वान आणि प्रतिथयश तज्ज्ञांचे एक पथक तयार करावे आणि पतंजली योगपीठ संस्थानात पाठवावे. या पथकाचे आम्ही स्वागत करू आणि त्यांना आमचा शोध आणि कोरोनिलवरील प्रमाण देऊ. तसेच कोरोनिलविषयी त्यांना असलेल्या प्रश्नांची उत्तरेही द्यायला आम्ही तयार आहोत, असे आचार्य बालकृष्ण म्हणाले.
अनेकांकडून कोरोनिलचे स्वागत
कोरोनिलचे अनेकांकडून स्वागत करण्यात आले आहे. मात्र, अनेकांनी पूर्वग्रहदूषित ठेवून याला नावं ठेवण्याचे काम केले, असा आरोप आचार्य बालकृष्ण यांनी यावेळी केला. तसेच उपचार पद्धती कोणतीही असो, कोरोनाविरोधात एकत्रितपणे लढा देणे आवश्यक आहे, असे आवाहन आचार्य बालकृष्ण यांनी केले आहे.