नवी दिल्ली :काँग्रेसमध्ये (Congress) असूनही काँग्रेसच्या धोरणांवर आणि निर्णयांवर टीका करणारे काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम (Acharya Pramod Krishnam) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी पंतप्रधानांनना उत्तर प्रदेशातील संभल येथे 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या श्री कल्की धामच्या पायाभरणी समारंभासाठी आमंत्रित केले. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पंतप्रधान मोदींच्या भेटीबाबत सांगितले की, 'भारताच्या पंतप्रधानांना भेटणे हा गुन्हा नाही, त्यांना श्री कल्की धामच्या पायाभरणी समारंभासाठी आमंत्रित करणे, हाही गुन्हा नाही आणि तो गुन्हा असेल तर मी त्याची शिक्षा भोगायला तयार आहे.' पीएम मोदींना भेटल्यानंतर आचार्य प्रमोद कृष्णम सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.
पीएम मोदींची भेट घेतल्यानंतर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी 'एक्स' वर सांगितले होते की, 'मला 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या श्री कल्की धामच्या पायाभरणी समारंभासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्याचा बहुमान मिळाला. हे आमंत्रण स्वीकारल्याबद्दल माननीय पंतप्रधानांचे मनःपूर्वक आभार.'
काँग्रेस नेत्याच्या या पोस्टला उत्तर देताना PM मोदी म्हणाले की, 'श्रद्धा आणि भक्तीच्या या पवित्र सोहळ्याचा भाग होणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आचार्य प्रमोदजी, आमंत्रणासाठी तुमचे मनःपूर्वक आभार.' विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून आचार्य प्रमोद काँग्रेस नेतृत्वाच्या काही निर्णयांवर टीका करत आहेत. कृष्णम यांनी 22 जानेवारीला अयोध्येत रामललाच्या अभिषेक सोहळ्यात सहभागी न होण्याच्या काँग्रेस नेत्यांच्या निर्णयावरही टीका केली होती.