राजनांदगाव : प्रसिद्ध जैन धर्मगुरू आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराज यांनी ‘सल्लेखना’ घेतल्यानंतर रविवारी छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील डोंगरगड येथील चंद्रगिरी तीर्थ येथे अखेरचा श्वास घेतला. सल्लेखना ही एक जैन धार्मिक प्रथा आहे, ज्यामध्ये आध्यात्मिक शुद्धीसाठी स्वेच्छेने मृत्यूपर्यंत उपवास केला जातो. आचार्य विद्यासागर महाराज यांनी पहाटे २:३५ वाजता चंद्रगिरी तीर्थ येथे ‘सल्लेखना’द्वारे समाधी घेतली, असे चंद्रगिरी तीर्थच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
अर्धा दिवस दुखवटा
आचार्य विद्यासागर महाराजांच्या सल्लेखना समाधीनंतर छत्तीसगड सरकारने रविवारी अर्ध्या दिवसाचा दुखवटा जाहीर केला होता.
राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात आला आणि सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले.
तीन दिवसांपासून साेडले हाेते अन्न आणि पाणी
‘महाराज गेल्या सहा महिन्यांपासून डोंगरगड येथील तीर्थावर मुक्कामाला होते आणि गेले काही दिवस त्यांची तब्येत बिघडली होती. गेल्या तीन दिवसांपासून ते सल्लेखना पाळत होते आणि त्यांनी अन्न-पाणी सोडले होते,’ असे प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
श्रद्धांजली वाहण्यासाठी दुपारी १ वाजता मिरवणूक काढण्यात आली. शेकडो भाविकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. चंद्रगिरी तीर्थावर त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.