नवी दिल्ली : त्रिपुरा, नागालँड व मेघालय या तीन राज्यांत सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. मतदानानंतर एक्झिट पोलच्या अंदाजानुसार त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजपची सत्ता येऊ शकते. तर मेघालायमध्ये भाजपला सत्तेसाठी तडजोड करावी लागण्याची शक्यता आहे. तिन्ही राज्यांतील निवडणूक निकालांपूर्वीच दिल्लीतील भाजप मुख्यालयात जल्लोषाची तयारी करण्यात आली आहे. आज सकाळी 8 वाजता या तिन्ही राज्यात मतमोजणीला सुरुवात झाली असून त्रिपुरातही भाजपला जनतेचा कौल मिळाल्याने भाजपचा अच्छे दिन आलेत, असेच म्हणता येईल.
पूर्वोत्तर राज्यातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये आज निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत. या तिन्ही राज्यात सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या हालचाली सुरू आहेत. भाजपकडून त्रिपुरा व मेघालयात तोडफोडीची शक्यता दिसते. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा, केंद्रीय मंत्री किरण रिजीजू, माजी मुख्यमंत्री विप्लव देव, ईशान्येकडील राज्यांचे समन्वयक संबित पात्रा यांच्यासह सहा नेत्यांना निवडणूक निकालापूर्वी तीन राज्यांत तैनात केले आहे.
त्रिपुरामध्ये भाजप आघाडी ४० जागांवर आघाडीवर असून सीपीएम आणि टीएमपी पक्षांना प्रत्येकी १० जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यामुळे, येथील निवडणुकीत भाजपचा वरचष्मा दिसून येतो.
त्रिपुरा व नागालँडमध्ये भाजप स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचे भाकीत वर्तविले आहे. तर मेघालयात त्रिशंकू सरकार स्थापन करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्रिपुरात भाजपचे सरकार आल्यास तेथे प्रथमच महिला मुख्यमंत्री होऊ शकते. प्रतिमा भौमिक यांना निवडणूक लढविण्यासाठी पाठवले, तेव्हाच याबाबतची शक्यता व्यक्त केली जात होती.
मेघालयात त्रिशंकू
त्रिशंकू निकालांची शक्यता व्यक्त केली जात आहे. येथे भाजपच्या तोडफोडीचा कस लागणार आहे. येथे कशा प्रकारे सरकार स्थापन होऊ शकते किंवा राष्ट्रपती राजवट लावून भाजप मागील दाराने सरकार चालवतो, हे येणारा काळच ठरवेल. केंद्रीय मंत्री किरण रिजीजू व भाजप नेते ऋतुराज सिन्हा आधीपासूनच मेघालयात ठाण मांडून आहेत. तृणमूल उमेदवारांवर भाजपची नजर राहील.