शांतीलाल गायकवाड
सुरत : ‘अच्छे दिन आनेवाले है’,पासून ‘कालाधन लावूंगा, सबके खाते में पंद्रह लाख’ या सर्वच घोषणा यंदा गुजरात विधानसभेच्या प्रचारातून व चर्चेतूनही अक्षरश: गायब होत्या. भारतीय जनता पार्टीला देशाची सत्ता काबीज करण्यात महत्त्वपूर्ण ठरलेल्या या घोषणांचा विरोधी पक्षांनाही चक्क विसर पडला, तर जनता या घोषणांना आता ‘ ईट इज जस्ट फन’ म्हणेपर्यंत परिपक्व झाल्याचे दिसले.
गुजरात निवडणुकीत मतदानाचा पहिला टप्पा गुरुवारी (दि.१) पार पडला. या टप्प्याचा प्रचार रंगला तो फक्त ‘ये गुजरात मैने बनाया है’ ते ‘३०० युनिट मुफ्त मै बिजली’ या घोषणा भोवतीच. भाजपाचा प्रचार, ‘ये गुजरात मैने बनाया है’ पासून सुरू होऊन, ‘मुझपे चढ गया भगवा रंग रंग’ इथंपर्यंत येऊन थांबत होता, तर ‘आप’ने केलेली ३०० युनिटची घोषणा तेवढी लोकप्रिय ठरलेली दिसली; परंतु २०१४ पूर्वी भाजपाने ज्या ज्या लोकप्रिय घोषणा केल्या होत्या. त्या सर्वच घोषणा या प्रचारातून हद्दपार झालेल्या होत्या. जनतेच्या अल्पस्मृतीतून तर या घोषणा केव्हाच बाद झाल्या; परंतु विरोधी पक्षांनाही या घोषणांचा विसर पडला, हे विशेष.
काँग्रेस उमेदवार पुनाजीभाई गामीत यांच्या प्रचार नियोजनासाठी पश्चिम बंगालमधून आलेले शेख मुनाफ यांना या संदर्भात विचारले असता ते म्हणाले, हे खरंय. ते मुद्दे प्रचारात यायला हवेत; परंतु येत नाहीत. ही खेदाचीच बाब आहे. काँग्रेस नेते हे मुद्दे का उचलत नाहीत? या प्रश्नावर त्यांच्याकडेही उत्तर नव्हते. पुनाभाईच्या प्रचार रॅलीत मात्र ‘सरकार लुटे रे भाई, सरकार लुटे’ हे गीत तेवढे वाजत होते. लिंबायत मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार गोपाल पाटील यांनी मात्र सांगितले की, ‘बहुत पडी महंगाई की मार, अबकी बार मोदी सरकार’ अशी घोषणा देणारे भाजपा व नरेंद्र मोदी आदी मंडळींना नागरिक जाब विचारणार का?
‘जनतेने विसरून जाणेच बरे’nवराछातील हिरा बाजारातील सटोडिया अमिनभाई यांनी भाजपाच्या घोषणांवर बोलणे टाळले, तर रिंगरोडच्या बेगमवाडी मार्केटमधील भावेश पटेल यांनी, त्या घोषणा म्हणजे ‘जस्ट ए फन’ म्हणून जनतेने विसरून जाणेच बरे असे सांगितले. nया उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या जाहीर सभातून काँग्रेसमुळेच गेले ७० वर्षे गरिबी वाढली असे छातीठोकपणे सांगत आहेत व त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.