बरेली, दि. 22 - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं चित्रं आहे. येथील बरेली येथे दोन अल्पवयीन मुलींवर अॅसिड हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दोन्ही मुलींची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या बरेली येथे दोन अल्पवयीन मुलींवर पुरूषांच्या एका घोळक्याने अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर दोन्ही मुलींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती असून दोघींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीला सुरूवात केली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांचं राज्य असल्याचं चित्रं निर्माण झालं आहे. बलात्कार, खून, लूट अशा घटनांमध्ये येथे दिवसागणीक वाढ होत असून गुन्हेगारांना पोलिसांचं भय राहिलेलं नसल्याचं चित्रं निर्माण झालं आहे.