नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांच्या कारभाराविरोधातली नाराजी उघड व्यक्त करणाऱ्या 4 न्यायाधीशांपैकी कुरियन जोसेफ यांनी हे प्रकरण लवकरच निवळेल अशी आशा व्यक्त केली आहे. कुरियन जोसेफ, जे चेलमेश्वर, मदन लोकूर आणि रंजन गोगोई यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर आरोप केले. सरन्यायाधीश पसंतीच्या न्यायाधीशांकडे महत्त्वाचे खटले सुपूर्द करत असल्याचा आरोप केला होता. यावर शनिवारी कुरियन यांनी हे संपूर्ण प्रकरण न्याय आणि न्यायपालिकेच्या हितासाठी पुढे आणल्याचं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टात्या न्यायाधिशांनी अशा प्रकारे पत्रकार परिषद घेऊन अंतर्गत नाराजी व्यक्त करण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे.
'न्यायाधीशांनी हे पाऊन उचलल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या प्रशासनात अधिक पारदर्शकता येईल. आम्ही न्याय आणि न्यायपालिकेच्या हितासाठी आवाज उठवला आहे. यापेक्षा अधिक मला काही सांगायचं नाही,' असं कुरियन जोसेफ यांनी केरळमधील एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हंटलं.
ज्या प्रकारे हे प्रकरण देशासमोर आले आहे, त्याचप्रकारे त्यावरील मार्गही निघेल. न्यायपालिकेवरील लोकांचा विश्वास वाढवण्यासाठीच हे पाऊल उचललं, असं कुरियन जोसेफ केरळमधील वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले आहेत.
नेमकं प्रकरण काय ?
देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली. न्यायमूर्ती जे चेलमेश्वर यांच्या घरी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टाचे प्रशासन गेल्या दोन महिन्यांपासून योग्यरित्या काम करत नसल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. जे चेलमेश्वर यांच्याबरोबर रंजन गोगोई, माधव बी लोकूर आणि कुरीयन जोसेफ या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली. गेल्या दोन महिन्यांतील कारभारामुळे आम्ही वरिष्ठ न्यायमूर्ती दुःखी झालो आहोत. यापूर्वी न्यायव्यवस्थेत अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या नाहीत. याबाबत सरन्यायाधीशांसोबतही बोललो पण काही उपयोग झाला नाही असं ते म्हणाले. आम्ही आमचा आत्मा विकला आहे असं उद्या कोणी म्हणू नये, न्यायव्यवस्था टिकली नाही तर लोकशाही टिकणार नाही असं ते म्हणाले. या प्रकरणी सरन्यायाधिशांना दोन महिन्यांपूर्वी एक पत्र पाठवलं होतं असं सांगत चेलमेश्वर यांनी ते पत्र सार्वजनिक केलं.