उत्तर प्रदेशात सरकार स्थापनेची तयारी सुरू झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या घरी सरकार स्थापनेसंदर्भात मोठी बैठक होत आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी उत्तर प्रदेशचे काळजीवाहू मुख्यमंत्री बुधवारी संध्याकाळी दिल्लीतील उत्तर प्रदेश सदनात पोहोचले. येथून ते जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी रवाना झाले आहेत. या बैठकीत योगी मंत्रिमंडळाची ब्लू प्रिंट तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्रिमंडळात कोणाचा समावेश होणार आणि कोणाला डच्चू मिळणार? याची यादी निश्चित केली जाण्याची शक्यता आहे.
यापूर्वी ही बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी होणार होती. अमित शाह यांच्याशिवाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, बीएल संतोष, योगी आदित्यनाथ आणि सुनील बन्सल या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे, गुरुवारी दुपारी चार वाजता लखनौ येथील लोकभवनात भाजप-विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत योगी आदित्यनाथ विधीमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड होणार आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहणार आहेत.
योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. लखनौ येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 25 मार्च रोजी शपथविधी सोहळा होणार आहे.