व्हिडिओ काढून न घेतल्यास सनी लिओनी, तोशीवर कारवाई; मध्य प्रदेशचे गृहमंत्री मिश्रा यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 07:11 AM2021-12-27T07:11:09+5:302021-12-27T07:11:43+5:30
सनी लिओनीने माफी मागावी का, असे विचारल्यावर मिश्रा म्हणाले, येत्या ३ दिवसांत यू-ट्यूबवरून तो व्हिडिओ काढून टाकण्यात आला नाही तर राज्य सरकार लिओनी आणि संगीतकार साकीब तोशी यांच्यावर कारवाई करील.
भोपाळ : सनी लिओनी असलेल्या संगीत व्हिडिओवर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी जोरदार टीका केली असून समाजमाध्यमांवरून तो काढून घेतला गेला नाही, तर तो लिओनी आणि ते गाणे बनवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. सनी लिओनीने माफी मागावी का, असे विचारल्यावर मिश्रा म्हणाले, येत्या ३ दिवसांत यू-ट्यूबवरून तो व्हिडिओ काढून टाकण्यात आला नाही तर राज्य सरकार लिओनी आणि संगीतकार साकीब तोशी यांच्यावर कारवाई करील.
मिश्रा म्हणाले, “सनी लिओनीवर गुन्हा दाखल केला जाईल. काही लोक सातत्याने हिंदूंच्या भावना दुखावत आहेत. भारतात राधाची मंदिरे आहेत. आम्ही तिची आराधना करतो. साकीब तोशी हे त्यांच्या धर्माशी संबंधित गाणी तयार करू शकतात; परंतु अशा गीतांमुळे आम्ही दुखावले जातो. तो व्हिडिओ ३ दिवसांत मागे घेतला गेला नाही तर मी कायदेशीर सल्ला घेऊन साकीब तोशी आणि सनी लिओनीवर कारवाई करेन.”
बुधवारी हा व्हिडिओ प्रदर्शित झाला. कनिका कपूर आणि अरिंदम चक्रवर्ती यांनी त्यात ‘मधुबन मे राधिका नाचे’ गायले आहे. भगवान कृष्ण आणि राधा यांच्यातील प्रेमावर हे गीत आधारित असून काही प्रेक्षकांनी या व्हिडिओतील विषयासक्त (सेन्शुअल) नृत्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावतात, असे म्हटले आहे. मथुरेतील पुजाऱ्यांनीही या व्हिडिओवर आक्षेप घेतलेला आहे. हे मूळ गीत १९६० मध्ये ‘कोहिनूर’ चित्रपटात मोहम्मद रफी यांनी गायलेले आहे.