महाराष्ट्रातील 'त्या' काँग्रेस आमदारांवर कारवाई?; फुटीरांची यादी दिल्लीला पाठवली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 11:43 AM2022-08-07T11:43:14+5:302022-08-07T11:43:44+5:30
काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे या निवडणुकीत पराभूत झाले. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी उघड झाली होती.
मुंबई - राज्यातील विधान परिषद निवडणुकीनंतर मोठा राजकीय भूकंप घडला. एकनाथ शिंदे यांच्यासह ५० आमदारांनी बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी भाजपानं ३ उमेदवार उभे केले होते तेव्हा या निवडणुकीतून भाजपानं माघार घ्यावी यासाठी मविआ नेते देवेंद्र फडणवीसांना भेटले. परंतु मविआने त्यांचा १ उमेदवार मागे घ्यावा त्या बदल्यात विधान परिषदेत भाजपा अतिरिक्त उमेदवार देणार नाही अशी ऑफर भाजपानं दिली.
भाजपा-मविआ यांच्यातील बोलणी फिस्कटली आणि विधान परिषद निवडणुकीत भाजपानं संख्याबळ कमी असतानाही ५ उमेदवार उभे केले. तर मविआकडून काँग्रेसनं २, राष्ट्रवादीने २ आणि शिवसेनेने २ उमेदवार उभे केले. या निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फुटली. काँग्रेसच्या २ उमेदवारांपैकी एकाला पराभव सहन करावा लागला. या निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची हक्काची मते फुटली. त्यामुळे याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली होती.
त्यात आता विधान परिषदेत भाजपाला मतदान करणाऱ्या आमदारांची यादी पक्षश्रेष्ठीला देण्यात आली आहे. आमदारांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील १, मराठवाड्यातील २-३ आणि मुंबईतील २ आमदार असल्याचं सांगण्यात येत आहे. या आमदारांनी विधान परिषदेत भाजपाला मतदान केले होते. त्यामुळे भाजपाच्या ५ व्या उमेदवाराचा विजय सोपा झाला होता. विधान परिषदेत भाजपाचे प्रसाद लाड यांचा अटीतटीच्या लढतीत विजय झाला होता. त्यानंतर काँग्रेसमधील मते फुटीची दखल घेत अहवाल सादर करण्याचे निर्देश हायकमांडनं दिले होते. त्यावर आता अहवाल तयार होऊन तो दिल्लीला पाठवला आहे.
काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे या निवडणुकीत पराभूत झाले. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी उघड झाली होती. काँग्रेसला ४४ पैकी ४१ पहिल्या पसंतीची मतं मिळाली. म्हणजेच काँग्रेसची ३ मतं फुटल्याची माहिती उघड झाली. या निवडणुकीत सर्वांत मोठा धक्का काँग्रेसला बसला. काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले खरे पाहता काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे सेफ उमेदवार मानले जात होते. भाई जगताप आणि भाजपच्या प्रसाद लाड यांच्यात खरी लढत झाल्याचे सांगितले जात होती. मात्र, प्रत्यक्षात भाई जगताप यांचा विजय झाला आणि चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा मोठा धक्का बसला.