कानपूर:उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्य शिक्षक पात्रता परीक्षेचा(UPTET) पेपर फुटल्याप्रकरणी कठोर भूमिका घेतली आहे. सीएम योगींनी आता पेपर फोडणाऱ्यांवर गँगस्टर कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. यासोबतच उमेदवारांची पुढील एका महिन्यात परत परीक्षा घेतली जाईल आणि त्यांच्या येण्या-जाण्याची व्यवस्था सरकार करेल, असेही योगींनी सांगितले.
आज(रविवार) सकाळी शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली यूपीटीईटी परीक्षा 10:00 वाजता केंद्रांवर सुरू झाली. केंद्रावर परीक्षा सुरू होताच पुढील 20 मिनिटांनी तहसीलदार, केंद्र प्रशासक यांनी सर्व खोल्यांमध्ये परीक्षा रद्द झाल्याची माहिती दिली. परीक्षा रद्द झाल्याची माहिती मिळताच परीक्षा देण्यासाठी आलेले सर्व उमेदवार हताश होऊन केंद्राबाहेर पडू लागले. अशा परिस्थितीत परीक्षा रद्द झाल्यानंतर पोलिसांनी कॉलेजच्या मुख्य गेटवर कडक बंदोबस्त ठेवला होता. केंद्रातून बाहेर पडलेल्या सर्व उमेदवारांना आलटून पालटून गेटबाहेर पाठवण्यात आले.
पेपरफुटीप्रकरणी 23 जणांना अटक
टीईटीचा पेपर फुटण्याच्या शक्यतेमुळे रद्द करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीईटी पेपरफुटीप्रकरणी एसटीएफने अनेक आरोपींना पकडले असून कारवाई सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 23 जणांना अटक केली आहे. यामध्ये प्रयागराज येथून 13 जणांना पकडण्यात आले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकार एका महिन्याच्या आत पुन्हा परीक्षा आयोजित करणार आहे.
उमेदवारांकडून वाहतुकीसाठी पैसे घेतले जाणार नाहीत
विशेष म्हणजे, पुढच्यावेळी UPTET परीक्षा देण्यासाठी आलेल्या उमेदवारांकडून वाहतुकीसाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. लवकरच परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. सध्या एसटीएफ संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.