ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - काळा पैसा बाळगणाऱ्यांचा कणा मोडण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर आता निनावी संपत्ती बागळणाऱ्यांवर सरकारने नजर वळवली आहे. प्राप्तिकर विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांत 42 निनावी मालमत्ता उघड झाल्या असून, निनावी मालमत्तांप्रकरणी 42 जणांना नोटिस बजावण्यात आली आहे.
नव्याने संमत करण्यात आलेल्या निनावी मालमत्ताविरोधी कायद्यानुसार अशी संपत्ती बाळगणाऱ्यांविरोधात जबर आर्थिक दंड आणि सात वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर दुसऱ्यांचा बेहिशेबी पैसा आपल्या खात्यावर जमा करू नका, असे आवाहन प्राप्तिकर विभागाकडून सर्वसामान्य नागरिकांना करण्यात येत होते. तसेच असे केल्यास फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा इशाराही देण्यात येत होता.
दरम्यान, नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रकमेचा भरणा झाला होता. अशा मोठ्या प्रमाणात रोख रक्कम भरणा झालेल्या खात्यांचा छडा प्राप्तिकर विभागाने लावला आहे. त्यातील 87 जणांना प्राप्तिकर कायद्यातील कलम 24 अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच 42 निनावी मालमत्ताधारक उघड झाले आहेत, अशी माहिती प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.