दिल्लीत जहांगीरपुरीमध्ये बुलडोझरने कारवाई; कोर्टाच्या आदेशाला न जुमानल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 06:21 AM2022-04-21T06:21:41+5:302022-04-21T06:22:40+5:30
शनिवारला जहांगीरपुरी भागातील मशीदपासून शोभायात्रा जात असताना दगडफेक झाली. येथील अतिक्रमणे हटविण्यासाठी उत्तर महापालिकेचे ९ बुलडोझर या परिसरात दाखल झाले.
नवी दिल्ली - गेल्या शनिवारी हनुमानजयंतीला शोभायात्रेवर दगडफेक झालेल्या जहांगीरपुरीतील मशीद परिसरातील अतिक्रमणे बुधवारी बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आली. यापूर्वी या परिसरात १२०० जवानांचा बंदोबस्त होता. या कारवाईला सुप्रीम कोर्टाने स्थगनादेश दिल्यानंतरही दोन तास कारवाई सुरूच होती, असा आरोप विरोधकांनी केला.
शनिवारला जहांगीरपुरी भागातील मशीदपासून शोभायात्रा जात असताना दगडफेक झाली. येथील अतिक्रमणे हटविण्यासाठी उत्तर महापालिकेचे ९ बुलडोझर या परिसरात दाखल झाले. कारवाईबाबत आधीच माहिती झाल्याने स्थगन आदेशासाठी याचिकाकर्त्यांनी कोर्टात धाव घेतली. मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांनी स्थगनादेश देत सुनावणी गुरुवारी निश्चित केली. परंतु बुलडोझर कारवाई थांबली नाही. कोर्टाच्या निर्णयानंतर जवळपास दोन तास कारवाई सुरूच होती, असा आरोप होत आहे.
द्वेषाचे बुलडोझर चालवू नका
द्वेषाचे बुलडोझर चालविणे बंद करा. देशामध्ये कोळसा टंचाई असून त्यावरही सरकारने तोडगा काढला पाहिजे.
- राहुल गांधी, काँग्रेस नेते