नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास संस्थे (NIA) ने 2023 मध्ये दहशतवादी, गँगस्टर, अंमली पदार्थांची तस्करी, मानवी तस्कर आणि राष्ट्रीय हिताच्या विरोधात काम करणार्या गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एनआयएच्या संपूर्ण देशभरातील कामकाजात अनेक पटींनी वाढ झाली. 2022 मध्ये अटक करण्यात आलेल्या 490 आरोपींच्या तुलनेत, एनआयएने या वर्षी एकूण 625 जणांना अटक केली.
यामध्ये ISIS प्रकरणांमध्ये 65, जिहादी प्रकरणांमध्ये 114, मानवी तस्करी प्रकरणात 45, दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारी कारवायांमध्ये 28, डाव्या विचारसरणीचे अतिरेकी (LWE) प्रकरणांमध्ये 76 आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये दोषी ठरविण्याचे प्रमाण 94.70% होते, तर आरोपींकडून 56 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. वर्षभरात NIA साठी सर्वात मोठे यश ISIS, काश्मिरी आणि इतर जिहादी तसेच देशात कार्यरत असलेल्या वाढते दहशतवादी नेटवर्क यांच्या विरोधात होते.
94.70% प्रकरणांमध्ये शिक्षा 2023 मध्ये दोषी ठरलेल्या 74 आरोपींना शिक्षा म्हणून 'सश्रम कारावास' आणि 'दंड' अशा विविध शिक्षा सुनावण्यात आली. एजन्सीने 94.70% चा एक मजबूत दोषसिद्धीचा दर राखला आहे. एजन्सीने भारत-पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरुन 102 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या प्रमुख फरार आरोपीला अटक केल्याने या संदर्भात सर्वात मोठे यश मिळाले.
2023 मध्ये 1040 छापे टाकलेNIA द्वारे शोध आणि छाप्यांमध्ये देखील मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढ नोंदवली गेली. छाप्यांची संख्या 2022 मध्ये 957 वरुन 2023 मध्ये 1040 पर्यंत वाढ झाली. देशभरातील जिहादविरोधी कारवाई NIA साठी 2023 मध्ये एक मोठी उपलब्धी ठरली. यामध्ये ISIS च्या देशभरातील मॉड्यूल्सचा पर्दाफाश झाला. डिसेंबरमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील 44 ठिकाणी छापे टाकून एकूण 15 आरोपींना अटक करण्यात आली होती, ज्यातून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी साहित्यही जप्त करण्यात आले होते. अशाप्रकारे वर्षभरात एनआयएने विविध कारवायांमध्ये शेकडो आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि मोठे दहशतवादी नेटवर्क उद्धवस्त केले.