नवी दिल्ली - रेल्वेच्या तिकीटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असल्यामुळे वाद निर्माण झाला होता. या संदर्भात निवडणूक आयोगाने दखल घेतल्यामुळे रेल्वे मंत्रालयाने मोदींचा फोटो असलेले तिकीट परत मागवले होते. त्यानंतर, आता रेल्वे विभागाकडून प्रवाशांना मोदींचे फोटो असलेले टिकीट वाटणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच त्यांची चौकशीही करण्यात येणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने आचारसंहितेचा भंग केल्याचे समोर आले होते. निवडणूक आयोगाकडून प्रचारात भारतीय सैन्याचा उल्लेख करू नका, असे सांगितले होते. तरीही, पंतप्रधान मोदी सैन्याच्या नावावर मत मागतात, तर रेल्वे प्रशासन आचार संहितेचा भंग करत मोदींचा फोटो असलेले तिकीट प्रवाशांना दिले जात होते.
लोकसभा निवडणुकीपूर्वी रेल्वे प्रशासानाने पंतप्रधान मोदींचा फोटो असलेले तिकीट मागे घेण्याचे सांगितले होते. परंतु, मोदींचा फोटो आणि सरकारी योजनेचा फोटो असलेले तिकीट उत्तर प्रदेशातील बारबंकी स्टेशनवर प्रवांशाना देण्यात येत आहे. या स्टेशनवर आचारसंहितेची राजरोसपणे पायामल्ली सुरू आहे. लखनौपासून 30 किमी अंतरावर असलेल्या बाराबंकी शहरात एका व्यक्तीने रविवारी रेल्वेचे तिकीट काढले. ज्यावर मोदींचा फोटो होता, तसेच सरकारी योजनेची माहिती देण्यात आली होती. संदर्भात मोहम्मद शब्बीर यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना दमदाटी करून पिटाळून लावण्यात आले. यावर रेल्वे प्रशासनाला विचारण्यात आल्यानंतर चुकून मोदींचा फोटो असलेले तिकीट मशिनमध्ये लावल्याचे सांगण्यात आले. गेल्या महिन्यात 20 मार्च रोजी रेल्वे प्रशासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेली तिकीटे मागे घेतले होते. या संदर्भात तृणमूल काँग्रेसने तक्रार केली होती. त्यावर रेल्वे प्रशासनाने म्हटले होते की, वाटप करण्यात येत असलेले तिकीट आधीच छापून घेतलेले आहेत.
दरम्यान, बारबंकी येथील रेल्वे प्रशासनाकडूनही हे तिकीट नजरचुकीने देण्यात आल्याचे म्हटले आहे. 13 एप्रिल रोजी जेव्हा संबंधित कर्मचाऱ्याची शिफ्ट चेंज झाली, पण जुनाच रोल वापरात आला होता. तरीही, याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असून त्यांची चौकशी करण्यात येईल, असेही तेथील एडीएमने म्हटले आहे.