ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ३ - कोलकाता राजधानी एक्सप्रेसमध्ये दिल्या जाणा-या जेवणात झूरळ आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रेल्वे अधिका-यांनी राबवलेल्या विशेष मोहीमेत ही गंभीर बाब समोर आली असून या निष्काळजीपणासाठी रेल्वेने गाडीत कॅटरिंग सुविधा देणा-या इंडियन कॅटरिंग आणि टूरिझम कॉर्पोरेशनवर (आयआरसीटीसी) कारवाईचा बडगाही उगारला आहे.
रेल्वे अर्थसंकल्प मांडताना रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी रेल्वे गाड्यांमध्ये मिळणा-या खाद्यपदार्थांचा दर्जा सुधारण्यावर भर दिला आहे. यानंतर जुलैमध्ये रेल्वेतर्फे देशभरात एक विशेष मोहीम राबवण्यात आली होती. यात रेल्वे अधिका-यांना अनेक गाड्यांमध्ये नित्कृष्ट दर्जाचे जेवण आढळून आले आहे. २३ जुलै रोजी कोलकाता राजधानी एक्सप्रेसमध्ये झालेल्या पाहणीत आयआरसीटीसीतर्फे दिल्या जाणा-या जेवणात झूरळ आढळले. तर अन्य १३ गाड्यांमध्ये जेवणाचा दर्जा नित्कृष्ट होता. या बेजबाबदारपणासाठी आयआरसीटीसीसह आर.के. असोसिएट्स, सनशाइन कॅटरर्स, वृंदावर प्रॉडक्ट्स या चार कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. आयआरसीटीसीवर एक लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. तर उर्वरित कंत्राटदारांवर ५० हजार ते एक लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. या चारही कंत्राटदारांकडून रेल्वेला एकूण ११ लाख रुपये दंड म्हणून मिळणार आहे. पश्चिम एक्सप्रेस, पुष्पक एक्सप्रेस, मोतीहारी एक्सप्रेस, शिवगंगा एक्सप्रेस, गोल्डन टेंपल मेल, नेत्रावती एक्सप्रेस, पंजाब मेल, हावडा - अमृतसर मेल, चंदीगड शताब्दी या रेल्वे गाड्यांमध्ये रेल्वे अधिका-यांनी पाहणी केली होती. एखादा कंत्राटदार पाचवेळा दोषी आढळल्यास त्याचे कंत्राटच रद्द करु असा इशाराच रेल्वे अधिका-यांनी दिला असून रेल्वेच्या या धडक कारवाईमुळे रेल्वेतील कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहे.