ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. 23 - कार्यालयात आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात महाव्यवस्थापकांसोबत द्वंव्दगीत गाण्यास नकार दिल्याबद्दल दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रायपूर येथील विभागीय व्यवस्थापकांनी एका महिला कर्मचाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची खातेनिहाय कारवाई सुरु केली आहे.दुर्ग येथे वरिष्ठ लीपिक असलेल्या अंजली तिवारी यांची नियुक्ती ‘सांस्कृतिक कोट्या’तून झालेली असल्याने आधी तयारी करण्यास सांगूनही त्यांनी गाणे म्हणण्यास नकार देणे हे गंभीर बेशिस्तीचे वर्तन आहे, असे विभागीय आयुक्तांनी या संदर्भात जारी केलेल्या कार्यालयीन आदेशात नमूद केले आहे.विभागीय व्यवस्थापक म्हणतात की, १६ जानेवारी रोजी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात महाव्यवस्थापकांसोबत गावे लागेल. तेव्हा काही द्वंद्वगीतांची तयारी करून ठेवा, असे तिवारी यांनी एक दिवस आधी सांगण्यात आले होते. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी महाव्यवस्थापकांनी एक ठराविक गीत म्हणण्यास सांगितले तेव्हा तिवारी यांनी, त्या गाण्याची तयारी झालेली नाही, असे सांगून त्यांच्यासोबत गाण्यास नकार दिला.तिवारी यांचे हे वर्तन पाहता त्यांना पुढील सहा महिने रायपूर विभागात आयोजित होणाऱ्या कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊ देऊ नये किंवा त्यांना रायपूरबाहेरही कार्यक्रमांसाठी पाठवून नये, असे निर्देशही विभागीय व्यवस्थापकांनी दिली आहेत.