लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : खनौरी सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलकांवर हरयाणा पोलिसांनी केलेली कारवाई ही रानटी असल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते अमरिंदर सिंग यांनी केली. त्यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली.
प्रीतपाल सिंग पंजाब-हरयाणा सीमेवरील खनौरी येथे लंगर सेवा करत असताना त्यांना हरयाणा पोलिसांनी कथितपणे ओढून नेले, मारहाण करण्यात आली, असा आरोप शेतकरी नेते बलदेव सिंग सिरसा यांनी केला आहे. प्रीतपाल यांच्यावर चंडीगडमध्ये उपचार सुरू आहेत.
मोबाइल इंटरनेट सेवा पूर्ववतहरयाणा सरकारने रविवारी पंजाबच्या सीमेला लागून असलेल्या अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिस्सार, फतेहाबाद आणि सिरसा या सात जिल्ह्यांमध्ये मोबाइल इंटरनेट आणि मोठ्या प्रमाणात एसएमएस सेवा पूर्ववत केली आहे. पंजाब-हरयाणा सीमेवरील शंभू बॉर्डरवर आंदोलक शेतकरी अद्याप ठाण मांडून आहेत.
सिंधू, टिकरी सीमेवरील अडथळे दूरशेतकऱ्यांनी मोर्चाला स्थगिती दिल्यानंतर रविवारी सिंधू आणि टिकरी सीमेवरील काही ठिकाणी नाकेबंदी हटवून प्रवाशांसाठी रस्ता मोकळा केला. आम्ही प्रवाशासाठी काही अडथळा दूर करत आहोत. तरीही पोलिस आणि निमलष्करी दलाकडून २४ तास पाळत ठेवण्यात ठेवली जाईल. सध्या वाहनांच्या वाहतुकीला परवानगी नाही, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. रविवारी, शहर पोलिसांनी सिंधू आणि टिकरी सीमेवर लहान मार्ग वापरून दिल्लीकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी सिमेंटचे दोन मोठे अडथळे दूर केले.
आंदोलनात आजवर काय-काय घडले?
- १३ फेब्रुवारी रोजी सुरक्षा दलांनी 'दिल्ली चलो' मोर्चा रोखल्यापासून आंदोलक शेतकरी हरयाणाला लागून असलेल्या पंजाबच्या खनौरी आणि शंभू सीमेवर ठाण मांडून आहेत.
- खनौरी सीमेवर बुधवारी सुरक्षेसाठी असलेल्या जवानांशी झालेल्या झटापटीत शुभकरन सिंग (२१) याचा मृत्यू झाला होता. शुभकरण सिंग याच्यावर अद्याप अंत्यसंस्कार झालेले नाहीत.
- यापूर्वी १८ फेब्रुवारी रोजी चंडीगडमध्ये केंद्रीय मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये झालेली चौथ्या फेरीतील चर्चाही यशस्वी ठरली नाही.
- मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलक २९ फेब्रुवारीपर्यंत हरयाणा आणि पंजाबच्या सीमेवर असलेल्या खनौरी आणि शंभू सीमेवर तळ ठोकून राहतील, असे शेतकरी नेत्यांनी सांगितले.