सुनील चावके, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :दिल्लीतील जीवघेण्या उष्म्याचा सामना करण्यासाठी दिल्लीच्या आपत्ती निवारण प्राधिकरणाने तयार केलेल्या कृती योजनेत अनेक उपाययोजना सुचविल्या आहेत. या शिफारशी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाकडे पाठविण्यात आल्या आहेत.
उन्हाळ्यादरम्यान दिल्लीच्या अनेक भागांमधील तापमान ५० अंश सेल्सिअसच्या वर जाते. उष्णतेच्या अशा सर्वाधिक झळा सहन करणाऱ्या नरेला, नजफगढ, विश्वासनगर, हरीनगर, जहांगीरपुरी, दिल्ली गेट, शास्त्री पार्क, वजीरपूर, ब्रिजवासन, हरकेशनगर यासारख्या भागांमध्ये पाणी, वीज, आरोग्य, निवास, स्वच्छता आणि खाण्या-पिण्याच्या साधनांची उपलब्धता विचारात घेऊन उष्णतेच्या तीव्रतेचा अभ्यास करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. पाच वर्षांपूर्वी सर्वाधिक उष्म्याची नोंद करण्यात आलेल्या या भागांसाठी दिल्लीच्या आपत्ती निवारण प्राधिकरणाने कृती योजना तयार केली असून, त्यासाठी केलेल्या शिफारशी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाकडे पाठविल्या आहेत.
काय आहेत शिफारसी?
उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी दुपारी शाळांमध्ये वर्ग न भरविणे, उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी शाळा आणि घरांची छते थंड राहावीत म्हणून छतांना पांढरा रंग लावणे, वर्गामध्ये उकाड्याचा सामना करण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करणे, आणीबाणीच्या परिस्थितीत अत्यवस्थ रुग्णांना इस्पितळात पोहोचविण्यासाठी मोबाइल वैद्यकीय व्हॅन तैनात करणे, इस्पितळांमध्ये उपचारांसाठी बेड आरक्षित ठेवणे अशा शिफारशी केल्या आहेत.