नवी दिल्ली - भारतीय लष्कराच्या घातक कमांडोंनी पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या रावळकोट सेक्टरमधील रुख चकरी भागात केलेल्या कारवाईचा पाकिस्तानला जबर फटका बसला आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भागात जाऊन कारवाई करणे इतके सोपे नव्हते पण घातक कमांडोंनी या मोहिमेतून आपले शौर्य, साहस आणि जिगर जगाला दाखवून दिली आहे. शनिवारी दुपारी पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमने केलेल्या हल्ल्यात मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासह दोन जवान शहीद झाले होते. त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या हेतूने ही कारवाई करण्यात आली.
अशी केली कारवाई सर्जिकल स्ट्राईकसारखे हे ऑपरेशन वाटत असले तरी भारतीय लष्कराने याला सिलेक्टीव्ह टार्गेटींग म्हटले आहे. म्हणजेच मर्यादीत स्वरुपाची ही लष्करी कारवाई होती. इनफॅन्ट्री बटालियनचे पाच ते सहा घातक कमांडो पाकव्याप्त काश्मीरमध्ये 250 ते 300 मीटर आतपर्यंत घुसले. तिथे जाऊन या कमांडोंनी आईडी स्फोटके पेरून ठेवली होती. पाकिस्तानी लष्कराचे गस्तीवर असलेले 59 बलुच युनिट तिथे पोहोचताच त्यांना स्फोटाचा पहिला हादरा बसला. त्याचवेळी तिथे ब-याचवेळापासून प्रतिक्षा करत असलेल्या कमांडोंनी बेछूट गोळीबार सुरु केला. या कारवाईत आपले तीन सैनिक ठार झाल्याचे पाकिस्तानने मान्य केले असले तरी प्रत्यक्षात हा आकडा जास्त असल्याचे गुप्तचर सूत्रांनी सांगितले.
स्थानिक कमांडरने या ऑपरेशनची आखणी केली आणि ब्रिगेड कमांडरने मंजुरी दिली. त्यामुळे या कारवाईची सर्जिकल स्ट्राईकशी तुलना करता येणार नाही. सर्जिकल स्ट्राईक उच्चस्तरावर आखण्यात आलेली मोहिम होती. भारतीय लष्कराच्या पॅरा कमांडोंनी पीओकेमध्ये 2 किलोमीटरपर्यंत आतमध्ये घुसून पीर पंजाल भागातील चार दहशतवादी तळ आणि त्यांच्याजवळ असलेल्या दोन पाकिस्तानी चौक्या उद्धवस्त केल्या होत्या. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईकशी या ऑपरेशनची तुलना होऊ शकत नाही असे लष्करी अधिका-याने सांगितले.