ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्याविरोधात लवकरच कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने झाकीर नाईक आणि त्याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनबाबत कडक धोरण स्वीकारले असून, त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची शिफारस केली आहे.
याबाबत गुरुवारी आलेल्या वृत्तानुसार नाईक आणि त्याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनबाबत गृहमंत्रालयाने एक पत्रक तयार केले आहे. या पत्रकातून झाकीर नाईक आणि त्याच्या संस्थेवर कारवाई करण्याची शिफारस गृहमंत्रालयाने केली आहे.
झाकीर नाईकची इस्लामिक रिसर्च सेंटर ही संस्था बेकायदेशीर घोषित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती गृहमंत्रालयाने या पत्रकातून दिली आहे. तसेच झाकीर नाईकची भाषणेही गृहमंत्रालयाच्या रडारवर आहेत. त्याची भाषणे अत्यंत प्रक्षोभक असून, आपल्या भाषणांमधून तो विविध धार्मिक समुहांमध्ये तेढ निर्माण करत असल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
बांगलादेशमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी झाकीरच्या भाषणामधून प्रेरित झाल्याचा आरोप आहे. तसेच कट्टर विचारांमुळे ब्रिटन, कॅनडा, मलेशिया या देशांनी झाकीर नाईकला त्यांच्या देशात येण्यास बंदी घातली आहे.