नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआयच्या कारवाईविरोधात केलेल्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या 5 अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. यामध्ये कोलकाताचे पोलीस आयुक्तही आहेत. या अधिकाऱ्यांना चांगली सेवा दिल्याबद्दल मिळालेली मेडल काढून घेणे, सेवाज्येष्ठतेनुसार मिळणाऱ्या पदोन्नत्या रद्द करण्यात येणार आहेत.
पश्चिम बंगालमध्ये काही दिवसांपूर्वी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी कोणतीही परवानगी नसताना छापा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात बसवून ठेवले होते. यामुळे संतप्त झालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआयच्या कारवाईवरून केंद्र सरकारविरोधात धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी पोलिस महासंचालक विरेंद्र कुमार यांच्यासह राजीव कुमार असे पाच पोलिस अधिकारी ममतांसोबत बसले होते.
हे अधिकारी केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या रडारवर आले आहेत. यामध्ये एडीजी सिक्युरिटी विनीत कुमार गोयल, एडीजी लॉ एंड ऑर्डर अनुज शर्मा, पोलिस आयुक्त ज्ञानवंत सिंह, कोलकाताचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुप्रतिम सरकार यांचा समावेश आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने आधी राजीव कुमार यांच्याविरोधात पहिली कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे. या कारवाईमध्ये त्यांना देण्यात आलेली मेडल काढून घेण्यात येणार आहेत. तसेच सेवाज्येष्ठता यादीतून त्यांचे नावही काढून टाकण्यात येणार आहे. तसेच पश्चिम बंगाल सरकारलाही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय राज्यांना सल्लासूची काढण्याचेही ठरविले आहे.