नेतृत्वबदलाबाबत सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या नेत्यांवर होणार कारवाई? मिळताहेत असे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 08:50 PM2020-08-24T20:50:56+5:302020-08-24T20:57:25+5:30
नेतृत्वबदलावरून काँग्रेसमध्ये निर्माण झालेला वाद अखेर आज सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संपुष्टात आला आहे.
नवी दिल्ली - गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसमध्ये नेतृत्वावरून सुरू असलेला वाद अखेर आज सोनिया गांधी यांची पुन्हा हंगामी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काहीसा निवळला आहे. मात्र नेतृत्वबदलावरून सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांवर आता कारवाई होण्याची शक्यता आहे. सोनिया गांधीना पत्र लिहिणाऱ्या या नेत्यांवर पक्षाच्या घटनेनुसार कारवाई होणार असल्याचे काँग्रेसच्या नेत्या अंबिका सोनी यांनी काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत सांगितल्याचे एएनआयने सूत्र्यांच्या हवाल्याने सांगितले आहे.
दरम्यान, गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांनी सांगितले की आम्ही मर्यादेत राहून प्रश्न उपस्थित केले आहेत. असे असूनही जर कुणाला हा शिस्तभंग वाटत असेत तर त्यांनी आमच्यावर कारवाई करावी. संघटनेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आमचे काही प्रश्न होते. त्यावर लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही पत्र लिहिले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
आज झालेल्या काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सोनिया गांधींकडेच पक्षाचे हंगामी अध्यक्षपद कायम ठेवावे, असा निर्णय घेण्यात आला. याबाबतची माहिती कार्यकारी समितीचे सदस्य के.एच मणियप्पा यांनी सांगितले की, सोनिया गांधींना हंगामी अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय एकमताने घण्यात आला आहे. पक्षामध्ये नेतृत्वाबाबत कुठलेही मतभेद नाही आहेत. तसेच गुलाम नबी आझाद, मुकुल वासनिक आणि आनंद शर्मा यांनीही नेतृत्वाबाबत कुठलाही वाद नाही, असे लिहून दिले आहे. तर काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठीची पुढील बैठक ही पुढच्या सहा महिन्यांत होईल, असे पी.एल. पुनिया यांनी सांगितले.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाम, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, शशी थरूर, खासदार विवेक तनखा, अकउउ आणि उहउ चे मुकुल वासनिक आणि जितिन प्रसाद, माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, राजेंद्र कौर भटट्ल, वीरप्पा मोइली, पृथ्वीराज चव्हाण, पी. जे. कुरियन, अजय सिंह, रेणुका चौधरी आणि मिलिंद देवरा, प्रदेशाध्यक्ष सांभाळण्याचा अनुभव असलेले राज बब्बर, अरविंदर सिंह लवली, कौल सिंह यांच्यासह अखिलेश प्रसाद सिंह, कुलदीप शर्मा, योगानंद शास्त्री आणि संदीप दीक्षित यांनी नेतृत्वबदलाबाबत पत्र लिहिले होते.