नवी दिल्ली: हरियाणाच्या करनालमध्ये शनिवारी भाजपाच्या बैठकीपूर्वी शेतकऱ्यांच्या विरोधानंतर पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला होता. यादरम्यान, एक व्हिडिओही समोर आला होता. त्या व्हिडिओत करनालचे सब-डिविजनल मॅजिस्ट्रेट पोलिसांना शेतकऱ्यांचे डोके फोडण्याचे आदेश देताना दिसत आहेत. आता या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई होणार आहे. हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी ही माहिती दिली.
हरियाणामध्ये भाजपाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी विरोध प्रदर्शन केलं. या विरोध प्रदर्शनादरम्यान पोलिसांनी अनेक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. त्यात अनेक शेतकऱ्यांचे डोके फुटले. देशभर या प्रकरणाची चर्चा झाली, देशभरातून या घटनेवर विरोध करण्यात आला. दरम्यान, या लाठीचार्जपूर्वी करनालच्या एसडीएमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला.
व्हिडिओमध्ये करनालचे एसडीएम आयुष सिन्हा पोलिसांना विरोध करणाऱ्या कोणत्याही शेतकऱ्याचे डोके फोडायला सांगताना दिसले. त्यानंतर शेतकऱ्यांवर लाठीचार्जही करण्यात आला. लाठीचार्जमध्ये अनेक शेतकरी जखमी झाले. शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जवर चौफेर टीका झाली. त्यानंतर आता आज हरियाणाच्या उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यावर आदेश दिल्याप्रकरणी करठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती दिली.