श्रीनगर - एका महिलेला हॉटेलमध्ये घेऊन गेल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले लष्करी अधिकारी मेजर लितूल गोगोई यांच्याबाबत लष्कराने सक्त भूमिका घेतली आहे. जर मेजर गोगोई हे या प्रकरणात दोषी आढळले, तर त्यांच्यावर कठोर कारवाई कण्यात येईल, असा इशारा लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दिला आहे. जवानांवर दगडफेक करणाऱ्या एका काश्मिरी तरुणाला जीपसमोर बांधून फिरल्याने मेजर गोगोई हे वर्षभरापूर्वी वादात सापडले होते. आता एका महिलेला घेऊन हॉटेलच्या रूममध्ये प्रवेश करताना सापडल्याने गोगोईंबाबत नवा वाद उद्भवला आहे. याबाबत लष्करप्रमुख म्हणाले की, भारतीय लष्करामधील कोणत्याही जवानाने जर काही चुकीचे काम केले, तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. जर मेजर गोगोई यांनी काही चुकीचे काम केले असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल." एका तरूणीसोबर गोगोई हॉटेलमध्ये गेल्याने या वादाला सुरूवात झाली आहे. गोगोईंसोबत आलेल्या तरुणीला हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याने गोगोई यांनी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांशी वाद घातला आणि हे प्रकरण शेवटी पोलिसांकडे पोहोचले होते. या प्रकरणी मेजर गोगोई यांची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्यांना परत पाठविण्यात आले होते. मेजर लीतुल गोगोई यांनी श्रीनगरमधील एका हॉटेलमध्ये रुम बुक केली होती. बुधवारी गोगोई हे हॉटेलमध्ये चेक- इन करत असताना त्यांचासोबत एक तरुणी होती. हॉटेल कर्मचाऱ्यांना ती तरुणी अल्पवयीन असल्याचा संशय आला. कर्मचाऱ्यांनी तरूणीचं ओळख पत्र तपासलं असता ती बडगामची रहिवासी असल्याचं समोर आलं. हॉटेलमध्ये स्थानिक तरुणींना प्रवेश दिला जाणार नाही, असं हॉटेल कर्मचाऱ्यांनी गोगोई यांना सांगितलं. यावरुन गोगोई आणि हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. गोगोईंसोबत आणखी एक तरुणही होता. कर्मचाऱ्यांशी वाद झाल्यानंतर संपूर्ण प्रकरण पोलिसांकडे गेल्याने गोगोई यांची चौकशी करण्यात आली.
मेजर गोगोई दोषी आढळल्यास करणार कारवाई - लष्करप्रमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 4:34 PM