ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या इसिसच्या चार संशयितांनी हरिव्दारमध्ये सुरु असलेल्या अर्धकुंभ आणि दिल्ली-एनसीआर रिजनमधील प्रमुख शॉपिंग मॉल्सवर हल्ला करण्याची योजना आखली होती. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ते हा हल्ला करणार होते. सिरिया आणि इराकमधील आपल्या मोहोरक्यांच्या ते संपर्कात होते अशी धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. या अटकेमुळे प्रथमच भारतात इसिसच्या कारवाया सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे. अटक केलेले इसिसचे चारही संशयित आयईडी स्फोटके बनवण्याच्या जवळ होते. ते व्हीओआयपी, व्हॉट्स आणि फेसबुकवरुन ते आपल्या मोहरक्यांच्या संपर्कात होते. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. हे चारही संशयित इसिसच्या संपर्कात होते हे सिध्द करणारे सबळ पुरावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक केलेल्या चौघांपैकी अखलाक उर रेहमान अभियांत्रिकी शाखेच्या तिस-या वर्षाला आहे. परिक्षेसाठी महाविद्यालयात प्रवेश करत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. मोहम्मद ओसामा आणि अझीझ स्थानिक कॉलेजमधून बीएचे शिक्षण घेत आहेत तर, मेहराज आयुर्वेद शास्त्राचे शिक्षण घेत आहे.
हरिव्दारमध्ये सुरु असलेल्या अर्ध कुंभवर आठ फेब्रुवारीला हल्ला करण्याची त्यांची योजना होती. त्याशिवाय दिल्लीतील हजारो लोक भेट देतात त्या मॉलवरही त्यांची नजर होती. त्यांनी आपल्या नियोजित लक्ष्याची पाहणीही केली होती.