लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली/दार्जिलिंग : स्वतंत्र दार्जिलिंग राज्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी हिंसाचाराच्या मार्गाने न जाण्याचे आवाहन केले. प्रश्न सोडवण्यासाठी संवाद साधा, असे ते येथे म्हणाले. हिंसाचार करून तुम्हाला उत्तर शोधता येणार नाही, असे सांगून गृहमंत्री म्हणाले की,‘‘ तेथे राहणाऱ्या लोकांनी शांत राहावे. सौहार्दाच्या वातावरणात या प्रश्नाशी संबंध असलेल्यांनी संवादाद्वारे आपापसांतील मतभेद व गैरसमज दूर करावेत.’’ भारतासारख्या लोकशाही देशात हिंसाचार करून कधीही प्रश्नाला उत्तर सापडणार नाही. आपापसांतील संवादातून कोणताही प्रश्न सोडवला जाऊ शकतो, असे ते म्हणाले. सिंह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी रविवारी तेथील परिस्थितीवर चर्चा केली. दार्जिलिंगमध्ये रविवारी हजारो निदर्शक चौक बाझारमध्ये जमा झाले. त्यांनी गोरखा जनमुक्ती मोर्चाचा (जीजेएम) पोलिस गोळीबारात ठार झालेल्या कार्यकर्त्याचा मृतदेह आणला होता. तेथे त्यांनी स्वतंत्र गोरखा राज्याच्या मागणीच्या घोषणा दिल्या. जीजेएमचे कार्यकर्ते आणि सुरक्षा दलांमध्ये शनिवारी मोठ्या प्रमाणावर चकमकी उडाल्यानंतर दार्जिलिंग जिल्ह्यात मोठ्या संख्येने सुरक्षादले तैनात करण्यात आली आहेत. निदर्शकांनी दार्जिलिंगमधून पोलिस आणि सुरक्षा दले तत्काळ काढून घेण्याच्या घोषणा दिल्या. सिंगमारी येथे पोलिस गोळीबारात आमचे दोन कार्यकर्ते ठार झाल्याचा दावा जीजेएमने केला. पोलिसांनी आम्ही गोळीबार केलाच नाही, असे म्हटले. जीजेएमचे प्रमुख बिमल गुरुंग यांनी ममता बॅनर्जी या धादांत खोटे बोलत असल्याचे रविवारी म्हटले. गोरखालँडसाठीचे हे आंदोलन ईशान्येकडील काही बंडखोरांचे गट व विदेशी देशांनी केलेला मोठा कट असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी शनिवारी केला होता. स्वतंत्र राज्यासाठीचे हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असेही गुरुंग यांनी स्पष्ट केले. बॅनर्जी यांचा हा आरोप निराधार असून त्यातून त्या लोकांची दिशाभूल करीत आहेत. हे आंदोलन काही राजकीय संघर्ष नाही तर आमच्या अस्मितेचा लढा आहे. गोरखालँड मिळेपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, असे ते दृकश्राव्य निवेदनात म्हणाले. स्वतंत्र गोरखालँडच्या मागणीला पाठिंबा म्हणून शेकडो मुस्लिमांनी रविवारी येथे शांतता मोर्चा काढला. त्यांनी पोलिस अत्याचारांचा निषेधही केला.
आंदोलकांनो, हिंसाचार सोडा!
By admin | Published: June 19, 2017 1:17 AM