नवी दिल्ली: भोजपुरी सुपरस्टार आणि गोरखपूरचे भाजप खासदार रवी किशन शुक्ला(Ravi kishan Shukla) यांच्या मोठ्या भावाचे निधन झाले आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात रमेश किशन शुक्ला(Ramesh Kishan Shukla) यांनी अखेरचा श्वास घेतला. मोठ्या भावाच्या निधनाची माहिती रवि किशन यांनी ट्विटरवरुन दिली.
रमेश किशन यांच्या निधनाची माहिती स्वतः रवी किशन यांनी ट्विटरवरुन दिली. ''दु:खद बातमी.. आज माझे मोठे भाऊ रमेश किशन शुक्ला यांचे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. खूप प्रयत्न केले, पण मोठ्या भावाला वाचवता आले नाही. वडिलांच्या पश्चात मोठ्या भावाचे जाणे वेदनादायी आहे. महादेव तुम्हाला तुमच्या चरणी स्थान देवो. ओम शांती...''
रवी किशन यांचे बंधू रमेश किशन हे मूळ जौनपूर जिल्ह्यातील केरकट कोतवाली भागातील बिसुई बरई गावचे रहिवासी होते. त्यांचे पार्थिव आज दिल्लीहून वाराणसीला आणण्यात येणार असून, तिथेच गंगा घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रमेश किशन शुक्ला हे त्यांच्या तीन भावांपैकी दुसरे होते. त्यांना काही काळापासून उच्च रक्तदाब, किडनी आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांनी ग्रासले होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते, मात्र अनेक प्रयत्न करुनही त्यांना वाचवता आले नाही.