हैदराबाद/मुंबई : ‘डोंबिवली फास्ट’, ‘लय भारी’, ‘दृश्यम’ यासारख्या वेगळ्या धाटणीच्या सिनेमांचे दिग्दर्शक आणि अभिनेते निशिकांत कामत यांचे सोमवारी हैदराबाद येथे निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. ३१ जुलैपासून कामत हे हैदराबाद येथे रुग्णालयात होते. सोमवारी दुपारी त्यांची प्रकृती खालावली. अखेर दुपारी ४.२४ मिनिटांनी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील आहेत.निशिकांत यांना गेल्या दोन वर्षांपासून लिव्हर सिरॉसिसचा त्रास होता, असे रुग्णालयाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्यांना ३१ जुलै रोजी ताप आणि जास्त थकवा जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला देण्यात आलेल्या औषधोपचारांना त्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा जाणवली होती.मात्र काही काळाने त्यांना अचानक अस्वस्थ वाटून अशक्तपणा आला. त्यामुळे त्यांना त्वरित अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. तेथे रविवारपासून त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आणि रक्तदाबही कमी झाला. सर्व वैद्यकीय शाखांमधील तज्ज्ञांनी प्रयत्न करुनही त्यांची प्रकृती खालावत होती. त्यांचे अवयव निकामी होत गेले आणि सोमवारी दुपारी ४.२४ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती रुग्णालयाने दिली.२००५ पासून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या पडद्यावर आलेल्या निशिकांत यांची ओळख हुशार, गुणी अभिनेता आणि दिग्दर्शक अशी होती. त्यांचा जन्म मुंबईत झाला होता. ताडदेव भागात त्यांचे बालपण गेले. तर शिक्षण मुंबई आणि गोव्यात झाले. २००६ मध्ये ‘डोंबिवली फास्ट’ या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
अभिनेता, दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन, गेल्या दोन वर्षांपासून होते लिव्हर सिरॉसिसने त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 3:39 AM