नवी दिल्ली, दि. 13 - पूर्व पत्नीला धडा शिकवण्यासाठी एका भोजपुरी अभिनेत्याने प्रेयसीच्या मदतीने आपल्याच मुलाचे अपहरण केल्याची घटना दिल्लीमध्ये घडली आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी अभिनेता आणि त्याच्या प्रेयसीला अटक केली आहे. त्यांनी दिल्लीच्या जामिया नगर परिसरातून मुलाचे अपहरण केले होते. पूर्वपत्नी मुलाला भेटू देत नव्हती त्यामुळे तिला धडा शिकवण्यासाठी म्हणून अभिनेत्याने आणि त्याच्या प्रेयसीने अपहरणाचा कट रचला. जामिया नगर पोलीस मागच्या तीन महिन्यांपासून मुलाचा शोध घेत होते. लक्ष्मीनगरमधील घरातून त्यांनी मुलाची सुटका केली.
अभिनेता मोहम्मद शाहीद (23) तीन महिन्यांपूर्वी पत्नीपासून विभक्त झाला होता. पत्नी मुस्कानने दुस-या पुरुषाबरोबर विवाह केल्यानंतर शाहीदने पत्नीला सोडून दिले व लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये प्रेयसीसोबत राहू लागला. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने आई म्हणून मुस्कानकडे दोनवर्षांच्या शेहनाझचा ताबा दिला. मुलगा मुस्कानकडे असल्याने शाहीदला मुलाला भेटता येत नव्हते. त्यामुळे त्याने प्रेयसीच्या मदतीने शेहनाझचे अपहरण केले व स्वत:सोबत ठेवले.
आपण केलेल्या गुन्ह्याकडून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी शाहीदने मुस्कानवर पैशांसाठी मुलाला विकून टाकल्याचा आरोप केला. 25 जूनला शाहीदने मुस्कानच्या आईला मुमताजला फोन केला व ईदच्या शॉपिंगसाठी मुलाला बाटला हाऊस येथे आणायला सांगितले. त्यावेळी त्याने प्रेयसी सुनैना शर्मा (22) उर्फ आलिशाबरोबर मुमताज यांची ओळख करुन दिली. शाहीदने मुमताजला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवले. त्यावेळी आलिशाने फ्रूट ज्यूस देण्याच्या बहाण्याने शेहनाझला पूर्व दिल्लीतील आपल्या एका नातेवाईकांच्या घरी घेऊन गेली.
बोलणे संपल्यानंतर मुलगा सोबत नसल्याचे मुमताज यांच्या लक्षात आले. त्यावेळी शाहीदने मुलाला शोधण्याचे नाटक केले व मुमताज यांच्या दुर्लक्षामुळे अपहरण झाल्याचा आरोप केला. तपासा दरम्यान शाहीद पोलिसांची दिशाभूल करत होता. माझ्या विरोधकांनी मुलाचे अपहरण करुन त्याला बरेली किंवा पश्चिम उत्तरप्रदेशमध्ये कुठे तरी नेले असावे असे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याच्या म्हणण्यानुसार त्या दिशेने तपास केला पण हाती काही लागले नाही. कुटुंबियांची चौकशी केल्यानंतर शाहीदची भमिका संशयास्पद वाटली. अखेर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली.
अपहरणानंतर आलिशा शेहनाझला घेऊन दिल्ली-एनसीआरमधील वेगवेगळया भागात फिरत होती. त्यानंतर त्यांनी पश्चिम विनोद नगरमध्ये एक घर भाडयाने घेतले तिथे तिघे राहत होते. अलहाबाद टू इस्लामाबाद या चित्रपटात शाहीदने भूमिका केली आहे.