पाटणा: अभिनेते नाना पाटेकर यांनी सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी सुशांतच्या पाटण्यातील घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. सुशांतच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून नानांनी श्रद्धांजली वाहिली. यानंतर त्याच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. जवळपास अर्धा तास नाना पाटेकर सुशांतच्या कुटुंबीयांसोबत होते. सुशांतच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी आलेल्या नाना पाटेकर यांनी सीआरपीएफच्या ४७ व्या बटालियनच्या कॅम्पसलादेखील भेट दिली. त्यावेळी त्यांनी सुशांतच्या आत्महत्येबद्दल दु:ख व्यक्त केलं. 'सुशांत सिंह अतिशय अद्भुत कलाकार होता. तो खूप सुंदर अभिनय करायचा. तो आता या जगात नाही, यावर विश्वासच बसत नाही. मी माझा मुलगा गमावल्यासारखं वाटतंय. सुशांत आता आपल्यात नाही, हे सत्य अजूनही मला पचवता येत नाही. सुशांत लहान होता. अजून ३० वर्षे तो काम करू शकत होता. सुशांतसारखी मुलं फार कमी असतात,' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.सुशांत सिंह राजपूतनं १४ जूनला त्याच्या मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. बॉलिवूडमधील प्रस्थापित मंडळींनी सुशांतला चित्रपट मिळू नये यासाठी प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाही, कंपूशाहीवर टीका होत आहे. त्यामुळेच अनेक बड्या कलाकारांनी सुशांतच्या कुटुंबीयांशी संवाद साधलेला नाही.बॉलिवूडमधल्या अनेक मोठ्या कलाकारांनी सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधलेला नसताना नाना पाटेकर काल पाटण्याला पोहोचले. त्यांनी सुशांतच्या कुटुंबासोबत संवाद साधत त्यांना धीर दिला. ताणतणावामुळे नैराश्य आल्यानं सुशांतनं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या या प्रकरणात पोलीस अनेकांची चौकशी करत आहेत. त्यात काही प्रॉडक्शन हाऊसेसचादेखील समावेश आहे. याबद्दल माध्यमांनी नाना पाटेकर यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यावर भाष्य करणं टाळलं.
मला माझाच मुलगा गमावल्यासारखं वाटतंय; सुशांतच्या मृत्यूबद्दल नानांकडून दु:ख व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 9:20 AM