नवी दिल्ली: दिल्लीतील शाहदरा भागातून एक दुःखद घटना समोर आली आहे. येथे नवरात्रीच्या (Navratrri) निमित्ताने रामलीलाचे (Ramleela) आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान, प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा मंचावरच हृदयक विकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाली. सुशील कौशिक (वय 45) असे या कलाकाराचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामलीला सुरू असताना सुशिल कौशिक यांना अचानक अचानक छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या, यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. विश्वकर्मा नगरमध्ये राहणारे सुशील व्यवसायाने प्रॉपर्टी डीलर होते. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिमध्ये प्रभू रामाची भूमिका साकारणारे सुशील कौशिक मंचावर आपले संवाद बोलताना दिसत आहेत. या वेळी त्यांना हृदयात वेदना जाणवू लागल्याने ते आपल्या छातीवर हात ठेवतात आणि अचानक स्टेजवरून खाली उतरतात. यानंतर त्यांना रुग्णालयात नेले असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. श्रीरामाचे निस्सीम भक्त असलेल्या सुशील यांच्या अचानक जाण्याने विश्वकर्मा नगरमधील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
यापूर्वी अशीच घटना घडलेली
नाटकात कलाकाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी जूनच्या सुरुवातीला एका नाटकात सैनिकाची भूमिका साकरणाऱ्या व्यक्तीचाही मंचावर मृत्यू झाला होता. उपस्थितांना वाटले की, कलाकार अभिनय करतोय, पण त्यांचा जीव गेला होता. बलविंदर सिंग छाबरा असे या व्यक्तीचे नाव होते. बराचवेळ बलविंदर सिंग उठले नाही, त्यानंतर सर्वांना त्यांच्या मृत्यूची बाब समजली.