बंगळुरू - दक्षिण भारतीय चित्रपटातील आघाडीचे कलावंत आणि ख्यातनाम अभिनेते प्रकाश राज यांनी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नेहमीच भाजपावर टीका करणाऱ्या प्रकाश राज यांनी कुठल्याही पक्षाचा झेंडा आपल्या हाती घेतला नाही. बंगळुरू मध्ये लोकसभा मतदारसंघातून प्रकाश राज यांनी अपक्ष म्हणून आपली उमेदवारी दाखल केली आहे.
यंदाच्या नववर्षाच्या सुरुवातीलाच प्रकाश राज यांनी राजकारणात प्रवेश करणार असल्याचे म्हटले होते. तसेच, आपल्या ट्विटर अकाऊंटवरुनही राज यांनी मी बंगळुरू मध्य या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे म्हटले होते. प्रकाश राज यांनी नेहमीच परखडपणे आपले मत मांडले आहे. तसेच भाजपा आणि मोदी सरकारविरुद्धही ते सातत्याने आपलं मत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मांडताना दिसतात. आता, भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर टीका करत प्रकाश राज यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
भाजपा हा हिंदुत्ववादी तर काँग्रेस पक्ष अल्पसंख्याकांचा केवळ वापरकर्ता असल्याची टीका राज यांनी केली. एका इंग्रजी वृत्तसंस्थेशी बोलताना राज यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच, काँग्रेस आणि भाजपा यांच्यावर निशाणा साधला. प्रकाश राज हे कम्युनिष्ट पक्षाकडून किंवा आम आदमी पार्टीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, असे वाटत होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. जेथे मी लहानाचा मोठा झालो, तेथूनच मी निवडणूक लढवतोय. कारण, मला या भागाची माहिती आहे, असे राज यांनी म्हटले आहे. दरम्यान, सिंघम चित्रपटातील प्रकाश राज यांनी भूमिका चांगलीच गाजली होती. सिंघम चित्रपटात त्यांनी नेत्याची भूमिका स्विकारली होती. जयकांत शिक्रे असे पात्र त्यांनी या चित्रपटातून साकारले होते.