नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना मी हिंदू मानत नाही असं वक्तव्य प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी केलं आहे. 'इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह साउथ 2018' या कार्यक्रमात बोलताना मोदी आणि अमित शहा यांना मी हिंदू मानत नाही असं प्रकाश राज म्हणाले.
मोदी सरकारमधील कोणी मंत्री एखाद्या धर्माचा नायनाट करण्याबाबत बोलतो पण पंतप्रधान आणि त्यांच्या पार्टीचे अध्यक्ष मौन धारण करतात, अशावेळी त्यांच्या हिंदू असण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात चूक नाही असं प्रकाश राज म्हणाले. मोदी आणि अमित शहांचा विरोधक असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
मी मोदीविरोधी आहे, मी अमित शहाविरोधी आहे, मी हेगडे विरोधीही आहे. माझ्या मते ते लोक हिंदू नाहीत. भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री अनंत हेगडेबाबत बोलताना राज म्हणाले, ते एका खास विचारधारेला जगातून संपवू इच्छितात, ते हिंदू असू शकत नाहीत. हत्या आणि हिंसेचं समर्थन करणा-यांना मी हिंदू मानत नाही असं राज म्हणाले.
या कार्यक्रमादरम्यान एक प्रेक्षक आणि प्रकाश राज यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. कोणी हिंदू आहे की नाही हे तुम्ही कसं ठरवू शकता असा प्रश्न या व्यक्तीने राज यांना विचारला. त्यावर तात्काळ राज यांनी, एखादा व्यक्ती हिंदूविरोधी आहे हे ते लोकं कसं ठरवतात असा प्रतिप्रश्न केला. या चर्चेदरम्यान कार्यक्रमात टाळ्यांचा कडकडाट झाला. जे लोक मारणा-यांचं समर्थन करतात ते हिंदू असू शकत नाही याचा पुनरूच्चार राज यांनी केला.
पाहा व्हिडीओ -