नवी दिल्ली : काळवीट शिकार प्रकरणातून अभिनेता सलमान खानची सुटका करण्याच्या निर्णयास आव्हान देणारी राजस्थान सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दाखल करून घेतली. या प्रकरणी लवकर सुनावणी केली जाईल, असे न्यायमूर्ती ए. के. सिकरी आणि न्यायमूर्ती आर. भानुमती यांच्या पीठाने सांगितले. न्यायालयाने सलमानला नोटीस जारी करून म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने कायदेशीर त्रुटींच्या आधारावर सलमानची सुटका केली होती. राजस्थान सरकारने याविरुद्ध गेल्या महिन्यात याचिका दाखल केली होती. राजस्थान सरकारने सलमानची दोषसिद्धी आणि तुरुंगवास रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली. कनिष्ठ न्यायालयाने सलमानला दोषी ठरवून पाच वर्षांचा कारावास ठोठावला होता. या निकालात त्रुटी असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले होते. उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल रद्द करण्यासाठी पुनरावलोकन अधिकारांचा दुरुपयोग केल्याचे सांगत राज्य सरकारने याचिका दाखल केली. आरोप सिद्ध केले आहेत..!सलमानची शिक्षा ठोस साक्षीवर अवलंबून होती. उच्च न्यायालयाने अत्यंत तांत्रिक मुद्याच्या आधारे हा निकाल फेटाळला होता. उच्च न्यायालयाची ही भूमिका सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही, असे अतिरिक्त महाधिवक्ता शिव मंगल शर्मा यांनी म्हटले होते. सुनावणीतील किरकोळ त्रुटींमुळे फिर्यादी पक्षाचा संपूर्ण खटला कमकुवत व्हायला नको. उच्च न्यायालयाला एकंदर परिस्थितीचे अवलोकन करता आले नाही. फिर्यादी पक्षाने सलमानवरील आरोप नि:संशय सिद्ध केले आहेत, असेही शर्मा म्हणाले.
अभिनेता सलमान पुन्हा अडचणीत
By admin | Published: November 12, 2016 2:22 AM