ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना सिनेसृष्टीतील मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
केंद्र सरकारतर्फे भारतीय सिनेसृष्टीत अतुलनीय कामगिरी करणा-यांना दादासाहेब फाळके हा पुरस्कार दिला जातो. दीवार, सत्यम शिवम सुंदरम, कभी कभी अशा असंख्य चित्रपटांमधील भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान पटकावणारे शशी कपूर यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
शशी कपूर यांचा जन्म १८ मार्च १९३८ मध्ये कोलकाता येथे झाला असून त्यांचे शिक्षण मुंबईतच झाले. वडिल पृथ्वीराज कपूर, भाऊ राजकपूर आणि शम्मी कपूर यांच्याकडून मिळालेला अभिनयाचा वारसा शशी कपूर यांनीही जपला. पृथ्वी थिएटरमध्ये पृथ्वीराज कपूर यांच्या नाटकांमध्ये शशी कपूर यांनी बाल कलाकाराचे काम केले. वयाच्या चौथ्या वर्षीच त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. १९४० च्या दशकात त्यांना मोठ्या पडद्यावर संधी मिळाली. आग या चित्रपटात राज कपूर यांच्या बालपणीची भूमिका करणारे शशी कपूर हे कौतुकास पात्र ठरले. १९६१ मध्ये धर्मपूत्र या सिनेमात त्यांनी प्रमुख कलाकाराची भूमिका निभावली. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर आपटला. पण शशी कपूर खचले नाहीत. यानंतर शशी कपूर यांचा जब जब फूल खिले चांगलाच गाजला व सिनेसृष्टीत शशी कपूर सुपरस्टार ठरले. ११५ हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.