ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. २२ - कोलकाता येथील कंपनीस दहा पट पैशांचे आमीष दाखवत नऊ कोटी रुपयांची गुंतवणूक करायला लावणे अभिनेत्री शिल्पा शेट्टीला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी व रिपू सदन कुंद्रा यांच्याविरोधात कोलकाता पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी व रिपू सदन कुंद्रा यांच्या इसेंशिअल स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमीटेड कंपनीने कोलकाता येथील एम के मिडीया प्रायव्हेट लिमीटेड कंपनीला दोन वर्षात १० पट परतावा मिळेल असे आमीष दाखवत त्यांना नऊ कोटी रुपयांची गुंतवणूक करायला सांगितले. यानुसार एम के मिडीयाने शिल्पा शेट्टी यांच्या कंपनीत गुंतवणूकही केली. या व्यवहारानंतर शिल्पा शेट्टी यांच्या कंपनीने इएसपीएलचे ३० लाख रुपयांचे इक्विटी शेअर्सही दिले होते. मात्र काही महिन्यांनी हा सर्व प्रकार बोगस असून इक्विटी शेअर्सही बोगस असल्याचे कंपनीच्या लक्षात आले. याप्रकरणी एम के मिडीयाचे प्रतिनिधी देबाशीष गुहा यांनी कोलकाता येथील हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने अभिनेत्री शिल्पा शेट्टीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आर्थिक फसवणूक, कट रचणे अशा विविध कलमांखाली शिल्पा शेट्टींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिल्पा शेट्टी यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.