नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या दिल्ली सरकारने चित्रपट अभिनेता सोनू सूदला ‘देश के मेंटर’ कार्यक्रमाचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे; परंतु ही नियुक्ती पंजाबमधील निवडणुका दृष्टिक्षेपात ठेवून करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता म्हणाले की, सूद यांना अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये वापरण्यासाठी ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्यात आले आहे.
ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्याचा निर्णय पंजाब विधानसभा निवडणुकीशी जोडला जाऊ लागला आहे. कारण तो पंजाबचा रहिवासी आहे आणि त्याची कीर्ती आणि समाजसेवेची चर्चा संपूर्ण पंजाबमध्ये आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पार्टी सूदला पंजाब विधानसभा निवडणुकीत उतरवण्याचा विचार करत आहे.
कामाची दखल-
सोनू सूदचा जन्म मोगा, पंजाब येथे झाला. त्याने हिंदी, तेलुगू, कन्नड आणि तमिळ भाषेतील चित्रपट तसेच पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे. या व्यतिरिक्त, सूदची कोरोना महामारीदरम्यान त्याच्या मानवतावादी कार्यासाठी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाद्वारे सन्माननीय २०२० विशेष मानवतावादी कृती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.