लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीएला अभूतपूर्व यश मिळालं. या यशाचे प्रमुख शिल्पकार ठरले, ते नरेंद्र मोदी. स्वाभाविकच, देश-विदेशातील प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्याबद्दल, मोदी सरकार 2.0 बद्दल लेख येत आहेत. असाच एक लेख 'गार्डियन' या ब्रिटीश वृत्तपत्रातही छापून आलाय. त्याच्या शीर्षकातून मोदींची प्रतिमा मुस्लिमविरोधी करण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसतंय. त्यावरून अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीनं 'गार्डियन'ला चपराक लगावली आहे.
India’s Muslims quiver in the new dawn of an emboldened Narendra Modi असं गार्डियनमधील लेखाचं शीर्षक आहे. विराट बहुमताने नरेद्र मोदींचा नव्याने उदय झाल्यानं भारतीय मुस्लिमांमध्ये अस्वस्थता, असा त्याचा अर्थ होतो. या लेखावर सुचित्रा कृष्णमूर्तीनं तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. पाश्चिमात्य माध्यमं मोदींना इतकी का घाबरतात? त्यांची चुकीची प्रतिमा निर्माण करायचा प्रयत्न का करतात? हे लेख लिहिणाऱ्यांनी कधी भारतात येऊन पाहिलंय का? आम्ही किती शांततेत राहतोय, हे बघितलंय का? असे प्रक्षोभक लेख लिहिण्यामागे काय अजेंडा आहे?, असे खरमरीत प्रश्न सुचित्राने विचारले आहेत.
दुसऱ्या ट्विटमध्येही तिनं 'गार्डियन'ची शाळाच घेतलीय. पाकिस्तानातील मुस्लिमांहून अधिक मुस्लिम भारतात राहतात. अनेक इस्लामी देशांमधील मुस्लिमांपेक्षा भारतातील मुस्लिमांची स्थिती खूपच चांगली आहे. आमच्याकडे आश्रयाला येणारे मुस्लिम निर्वासित बोटीत बसून पळून जात नाहीत, असा टोलाही सुचित्रानं लगावला आहे.
'कभी हां कभी ना' या शाहरुख खानच्या चित्रपटात सुचित्रा नायिका होती. प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक शेखर कपूर यांची ती दुसरी पत्नी होती. २००७ मध्ये ते दोघं वेगळे झाले होते. शेखर कपूर यांनीही अलीकडेच 'गार्डियन'मधील एका लेखावर टीकास्त्र सोडलं होतं. बेरोजगारी, बिकट अर्थव्यवस्था, हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण यामुळे मोदी देशाला अंधारयुगात घेऊन जाऊ शकतात, असं मत लेखात मांडलं होतं. त्याला शेखर कपूर यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.