अमृतसर : अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये रावणदहन पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (19 ऑक्टोबर) रात्री घडली. या भीषण दुर्घटनेत 61 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 72 जण जखमी झाले आहेत. रामलीलामध्ये रावणाची भूमिका साकारणाऱ्या दलबीर सिंहचाही या अपघातातमृत्यू झाला आहे. मात्र दलबीरने स्वत: च्या जीवाची पर्वा न करता आठ जणांचे प्राण वाचवले.
#AmritsarTrainAccident : ... आणि रावणाने घेतला जगाचा निरोप
शुक्रवारी रावणदहन पाहण्यासाठी दलबीर रुळावर उपस्थित होता. त्याचवेळी त्याने जालंधर-अमृतसर डीएमयू ही ट्रेन रुळावर उभ्या असलेल्या गर्दीच्या दिशेने भरधाव वेगात येत असल्याचं दिसलं. त्याने लगेचच पळत जाऊन ट्रॅकवर उभ्या असलेल्या लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्या किमान 8 जणांना धक्का देऊन त्यानं बाजूला सारलं. पण तो स्वतःचा जीव वाचवण्यात अपयशी ठरला.
'दलबीर दरवर्षी रावणाची भूमिका साकारायचा त्यामुळे आम्ही नेहमी त्याची चेष्टा करायचो. आम्ही त्याला लंकेश बोलायचो. पण शुक्रवारी त्याने जे काम केलं ते एखाद्या हिरोप्रमाणे होतं' अशी प्रतिक्रिया दलबीरचे शेजारी कृष्ण लाल यांनी दिली. दलबीरच्या मृत्युमुळे त्याच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. तो आता या जगात नाही या गोष्टीवर त्यांच्या पत्नीचा आणि आईचा विश्वासच बसत नाही. दलबीर अनेक वर्षांपासून रामलीलामध्ये रावणाची भूमिका साकारत असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. रावण दहनाच्या दिवशीच त्याचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. तसेच या अपघाताला स्थानिक प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.