गेल्या काही काळापासून देशात रियल इस्टेट सेक्टर वेगाने वाढत आहे. मात्र याचदरम्यान, आपल्याकडे साठवलेल्या धनातून घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अनेकांना फसवणुकीचा सामना करावा लागत आहे. नवी घटना कोलकाता येथून समोर आली आहे. येथे ७ सेन्स इंटरनॅशनल नावाच्या रियल इस्टेट कंपनीने अपार्टमेंट विकण्याच्या नावाखाली कथितपणे मोठा घोटाळा केला आहे. कोट्यवधी रुपयांचा हा घोटाळा समोर आल्यानंतर ईडीने तपासाला सुरुवात केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पैसे घेऊन अपार्टमेंट न देणाऱ्या या कंपनीसोबत बंगाली कलाकार आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांचं कनेक्शन समोर आलं आहे.
कोलकाता स्थित ७ सेन्स इंटरनॅशनल कंपनी ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहे. मात्र आतापर्यंत ज्या लोकांकडून पैसे घेऊन अपार्टमेंट देण्याची हमी देण्यात आली होती. त्यामधील कुणालाही आपला पैस परत मिळालेला नाही. या प्रकरणामध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांचं कनेक्शन एका तक्रारीमधून समोर आलं आहे. याबाबत ईडीला या कथित फसवणुकी प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांच्याविरोधात तक्रार मिळाली आहे. ही तक्रार भाजपा नेते शंकुदेब पांडा यांनी ईडीकडे वैयक्तिकरीत्या केली आहे.
ईडीकडे केलेल्या आपल्या तक्रारीमध्ये शंकुदेब पांडा यांनी सांगितलं की, तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ ७ सेन्स इंटरनॅशनलच्या डायरेक्टर्सपैकी एक आहेत. त्यांना अलिपूर कोर्टामधून एक समन्सही मिळालेलं आहे. पांडा यांनी पुढे दावा केला की, इंडियन ओव्हरसिस बँकेच्या सुमारे ४२९ कर्मचाऱ्यांना कोलकात्याच्या बाहेरील भागात अपार्टमेंट देण्याच्या बदल्यात फसवणूक करण्यात आली. तसेच घर देण्याचं आश्वासन देऊन कंपनीने ग्राहकांकडून डाऊन पेमेंट म्हणून मोठ्या प्रमाणावर रक्कम उकळली होती.
भाजपा नेते शंकुदेब पांडा यांनी सांगितले की, हा एक मोठा घोटाळा आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ या कंपनीशी संबंधित आहेत. या कंपनीने लोकांकडून ५.५० लाख रुपये घेतले होते. या सर्वाची सुरुवात ही ९ वर्षांपूर्वी २०१४ मध्ये झाली होती. मात्र पैसे घेतल्यानंतर आतापर्यंत कुणालाही कुठलाही फ्लॅट मिळालेल नाही.