कंगना राणौतची खासदारकी धोक्यात?; हायकोर्टानं जारी केली नोटीस, जाणून घ्या प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 08:44 AM2024-07-25T08:44:21+5:302024-07-25T08:46:13+5:30
अभिनेत्री कंगना राणौत ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून संसदेत पोहचली आहे.
नवी दिल्ली - बॉलिवूड क्वीन कंगना राणौत सध्या लोकसभेत खासदारकीच्या भूमिकेत आहे. मात्र त्यांची ही खासदारकी रद्द करावी अशी मागणी करत एकाने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. हिमाचलच्या मंडी येथून कंगना राणौत भाजपाच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आल्या.आता कंगना राणौत यांची खासदारकी अडचणीत आली आहे. हायकोर्टानेही कंगनाला नोटीस जारी केली आहे. येत्या २१ ऑगस्टपर्यंत कंगनाला त्यांचं म्हणणं मांडण्याची मुदत कोर्टाने दिली आहे.
लायक राम नेगी यांनी कंगनाविरोधात याचिका दाखल केली आहे. त्यांनी कंगना राणौत यांची निवड रद्द करण्याची मागणी याचिकेतून हिमाचल हायकोर्टाला केली आहे. नायक वन विभागाचे माजी कर्मचारी आहेत. त्यांनी वेळेआधीच वीआरएस घेतली आहे. नेगी यांना निवडणूक लढवायची होती परंतु त्यांचा उमेदवारी अर्ज मंडीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने रद्द केला होता असा आरोप त्यांनी याचिकेत केला.
त्याचसोबत उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्याकडून सरकारी निवासस्थानाचं वीज, पाणी आणि टेलिफोन यांचे नो ड्यूज प्रमाणपत्र आणायला सांगण्यात आलं होतं. त्यासाठी त्यांना १ दिवसाचा अवधी दिला होता. मात्र दुसऱ्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्यांना ही कागदपत्रे सोपवली तेव्हा त्यांनी ते घेण्यास नकार दिला आणि माझा उमेदवारी अर्ज रद्द केला असं याचिकेत म्हटलं आहे.
...अन् कंगना राणौत बनली खासदार
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ही नेहमी तिच्या बोल्ड आणि रोखठोक विधानांमुळे कायम चर्चेत राहिली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं कंगना राणौतला हिमाचल प्रदेशच्या मंडी येथे उमेदवारी दिली. या ठिकाणी कंगनाचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. मंडीत इंडिया आघाडीकडून काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह यांना कंगना राणौत यांनी ७४ हजार ७५५ मतांनी हरवले. याठिकाणी तिसऱ्या नंबरवर बहुजन समाजवादी पार्टीचे डॉ. प्रकाशचंद्र भारद्वाज होते, भारद्वाज यांना ४३९३ मते मिळाली होती.
खासदारकी रद्द होऊ शकते?
लोकप्रतिनिधी अधिनियम कलम १०० अंतर्गत मंडी निवडणुकीत खासदार म्हणून निवडलेल्या कंगना राणौतची खासदारकी रद्द होऊ शकते जर याचिकाकर्त्यांनी कोर्टात त्यांचा उमेदवारी अर्ज बेकायदेशीररित्या रद्द करण्यात आला होता हे सिद्ध केले तर कोर्ट हा निर्णय देऊ शकतं.