कधी आपल्या वक्तव्याने तर कधी आपल्या चित्रपटांमुळे सातत्याने चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आज उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील ठाकूर बांके बिहारी मंदिरात पोहोचली. तिने येथील मंदिरात पूजा करून बांकेबिहारींचे आशीर्वाद घेतले. तर दुसरीकडे कंगनाच्या आगमनाची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी झाली होती. (Kangana Ranaut on Politics)
यादरम्यान तेथे पोहोचलेल्या पत्रकारांनी कंगनाला निवडणुकीत कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार, असा प्रश्न केला. यावर उत्तर देताना "जे राष्ट्रवादी आहेत त्यांच्यासाठी मी प्रचार करेन. मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही आणि प्रचारावेळीही अशाच पक्षाला सपोर्ट करेन जो पक्ष राष्ट्रवादी आहे, असे कंगना म्हणाली.
खरेतर, पद्मश्री आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा बांके बिहारी भेटीचा कार्यक्रम गोपनीय होता. मात्र, जमाव अनियंत्रित झाल्यानंतर कंगना राणौतच्या सुरक्षेसाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.
पंजाबमध्ये आंदोलकांनी कंगनाची गाडी रोखत केली होती घोषणाबाजी -शेतकरी आंदोलनाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या विरोधात पंजाबमध्ये आंदोलकांनी शुक्रवारी अभिनेत्री कंगना रणौतची गाडी रोखत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच या वक्तव्यांसाठी तिने माफीची मागणी केली. यानंतर कंगनाने आपल्या इंस्टाग्रामवर काही व्हिडीओ शेअर करत आंदोलकांवर शिवीगाळ केल्याचा आणि हल्ला करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला. कंगनाने अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. मात्र काही वेळाने कंगना फेसबुकवर व्हिडीओ टाकून आज पंजाबमध्ये माझ्या गाडीला घेराव घालणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांशी मी बोलले . माझ्या टिप्पण्यांबद्दलचा गैरसमज दूर झाल्यानंतर मला शुभेच्छा देण्यात आल्या असल्याची पोस्ट तिने केली.