कंगना रणौतवर (Kangana Ranaut) तिच्या एका वक्तव्यामुळे प्रचंड टीका होत आहे. देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याला 'भीक', असे संबोधून खरे स्वातंत्र्य 2014 नंतर मिळाले, असे तिने म्हटले आहे. यासंदर्भात तिने शनिवारी एक पोस्ट करत म्हटले होते की, जर तिची चूक कुणी सिद्ध केली, तर ती पद्मश्री परत करेल. यानंतर आता कंगनाने पुन्हा एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. एका लेखाचा हवाला देत, तिने म्हटले आहे, की जर तुम्ही तो समजून घेतला, तर तिने जे म्हटले आहे, ते समजू शकेल.
कंगनाने म्हटले आहे, 2015 मध्ये बीबीसीत एक लेख प्रसिद्ध झाला होता. यात त्याचे उत्तर मिळू शकते. तिने लिहिले आहे, 'आपल्या राष्ट्र निर्मात्यांनी, भारतात करण्यात आलेले असंख्य अपराध, आपल्या देशाची संपत्ती लुटणे, आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची निर्घृण हत्या करणे, देशाचे दोन तुकडे करणे आणि स्वातंत्र्याच्या वेळी झालेल्या गुन्हे यांसाठी इंग्रजांना जबाबदार ठरवले नाही.'
काय म्हणाली कंगना -दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीनुसार भारत सोडला. विन्स्टन चर्चिल यांना युद्धवीर म्हणून गौरवण्यात आले. बंगालच्या उपासमारीला हीच व्यक्ती जबाबदार होती. स्वतंत्र भारतातील न्यायालयांमध्ये त्याच्यावर खटला चालला गेला? नाही. सिरिल रॅडक्लिफ ही इंग्रज व्यक्ती कधीही भारतात आली नव्हती, त्याला फाळणीच्या पाच आठवडे आधी भारतात आणण्यात आले होते.‘
काँग्रेस आणि इंग्रजांना ठरवलं जबाबदार -ब्रिटिशांनी फाळणीसंदर्भात ज्या अटी ठरविल्या होत्या, त्या समितीत काँग्रेस आणि मुस्लीम लीगचे सदस्य होते. फाळणीच्या वेळी 10 लाख लोक मारले गेले. जे मेले त्यांना स्वातंत्र्य मिळाले का? फाळणीची लाइन ओढणारे ब्रिटिश अथवा काँग्रेस त्या नरसंहाराला जबाबदार नव्हते का?'
स्वातंत्र्यसेनानींसाठी लिहिलं... -कंगना रणौतने पुढे ब्रिटिश सरकारला पाठवलेल्या एका पत्राचाही उल्लेख केला आहे. ती लिहिते, 'भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांना काय माहीत होते, की ब्रिटीश आणि आमचे राष्ट्रनिर्माते अखंड भारताचे दोन तुकडे करतील, ज्यामुळे दहा लाख लोकांची कत्तल होईल.'
शेवटी तिने म्हटले की, 'मी एवढेच बोलून माझे म्हणणे संपवते की, जर आपण भारतातील असंख्य गुन्ह्यांसाठी इंग्रजांना जबाबदार धरत नसू, तरी आपण आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमानच करत आहोत.'