ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - भगवान वाल्मिकी आणि त्यांची साधना करणाऱ्या काही भक्तांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आयटम गर्ल राखी सावंतला अखेर पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी राखी सावंतला अटक करण्यासाठी पंजाब पोलीस लुधियानाहून मुंबईसाठी रवाना झाले होते. सतत वादात असणा-या राखी सावंतविरोधात स्थानिक न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्यानंतर पोलीस कारवाई करण्यासाठी रवाना झाले होते. 9 मार्च रोजी न्यायालयाने राखी सावंतला हजर राहण्याचा आदेश देऊनही हजर न राहिल्याने अखेर अटक वॉरंट जारी करण्यात आला होता.
राखी सावंतने भगवान वाल्मिकी आणि त्यांची साधना करणाऱ्या काही भक्तांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटक झाली आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राखीने वाल्मिकी समाजाला अनुसरुन भगवान वाल्मिकींचा उल्लेख ‘मारेकरी’ म्हणून केला होता. तेव्हापासून राखीवर वाल्मिकी समाजाचा रोष ओढावला आहे. या घटनेनंतर राखीला न्यायालयाकडून वारंवार समन्स पाठवूनही तिने न्यायालयात हजर न राहता न्यायव्यवस्थेचा एक प्रकारे अपमानच केला. त्यामुळे हे सर्व प्रकरण आता तिच्या अंगलगट येताना दिसत आहे.