मुंबई : अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दाखल तक्रारीनुसार, चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांना पोलिसांनी समन्स बजावले. त्यानुसार, त्यांना चौकशीसाठी गुरुवारी वर्सोवा पोलीस ठाण्यात हजर राहावे लागेल. लैंगिक अत्याचाराचा प्रकार २०१३-१४ दरम्यान घडल्याचा अभिनेत्रीचा आरोप आहे. तिच्या तक्रारीनुसार, कश्यप यांच्यावर वर्सोवा पोलिसांनी २२ सप्टेंबर, २०२० रोजी दखलपात्र गुन्हा दाखल केला.
कश्यप यांना अटक करण्याची मागणी पीडित अभिनेत्रीच्या वतीने तिचे वकील अॅड. नितीन सातपुते यांनी केली. त्यासाठी उपोषणाचा इशाराही देण्यात आला. तसेच वाय सुरक्षा मिळावी यासाठी पीडितेने सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीदेखील भेट घेतली होती. त्यानंतर आता गुरुवारी म्हणजे १ आॅक्टोबर, २०२० रोजी कश्यप यांना या प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, पाली हिल परिसरात कथित घटनास्थळ असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आल्याने तपास अधिकाऱ्यांसोबत अभिनेत्रीने त्या ठिकाणीही भेट दिली होती.आरोप फेटाळलेसध्या कश्यप यांच्या विरोधात पुरावे गोळा करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. कश्यप यांनी मात्र त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत.